अनुसूचित जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग आरक्षित करा
१५ ऐवजी २९ जागा सोडण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः मुंबई महापालिका निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी १५ प्रभाग आरक्षित करण्यात येणार आहेत. या जागा लोकसंख्येच्या प्रमाणात तुटपुंज्या असून, त्यात वाढ करून त्या २९ पर्यंत वाढवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गेल्या काही वर्षांत अनुसूचित जातींची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे आरक्षित प्रभागांची संख्या वाढवून ती २९ करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे, राज्य सरकारकडे यापूर्वी केली आहे.
जानेवारी मध्यापर्यंत निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर २२७ प्रभागांपैकी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गांसाठी किती जागा आरक्षित राहतील, याची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार १५ प्रभाग अनुसूचित जातीसाठी आणि दोन वॉर्ड अनुसूचित जमातींसाठी आरक्षित ठेवण्याची शक्यता आहे, मात्र या जागा लोकसंख्येच्या प्रमाणात अपूऱ्या असून, त्यात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.
अनुसूचित जातींसाठीच्या १३ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. लोकसंख्येच्या प्रमाणात जागाही आरक्षित झाल्या पाहिजेत. ५० टक्के खुल्या प्रवर्गात किती लाभ झाला, याचेही मूल्यमापन व्हायला हवे.
- अर्जुन डांगळे, ज्येष्ठ साहित्यिक
मुंबई महापालिका निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात येणाऱ्या १५ जागा अपुऱ्या आहेत. त्यात वाढ करून २९ पर्यंत वाढवाव्यात. त्याबाबत राज्य सरकारकडे मागणी केली आहे. याच मागणीसाठी १० ऑक्टोबरला आम्ही केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे जाणार आहोत.
- विजय (भाई) गिरकर,
भाजपा नेते, माजी मंत्री
अनुसूचित जातींसाठी १५ जागा या तुटपुंज्या आहेत. १३ टक्के प्रमाणे जागा आरक्षित व्हाव्यात, असा आमचा आग्रह आहे. मुंबईत जागा वाढवण्याची मागणी आम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. वाढत्या लोकसंख्येचा विचार करावा.
- कचरू यादव, अनुसूचित जाती विभाग, मुंबई काँग्रेस
अनुसूचित जातीसाठी आरक्षित होणारे १५ प्रभाग
९३, ११८, १३३, १४०, १४१, १४६, १४७, १५१, १५२, १५५, १८३, १८६, १८९, १९९ आणि २१५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.