अवयवदानातून तिघांना जीवदान
मुंबई, ता. १४ : फोर्टिस रुग्णालयात सोमवारी (ता. १३) पार पडलेल्या अवयवदानामुळे तिघांना जीवदान मिळाले. मुंबई विभागातील हे ४३ वे अवयवदान ठरले. फोर्टिस रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे एका ५३ वर्षीय व्यक्तीला दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांना, नातेवाइकांना तेथील डॉक्टर आणि प्रत्यारोपणाच्या समन्वयकांनी अवयवदानाबद्दल माहिती दिली. अवयवदानाचे महत्त्व पटवून दिल्यावर कुटुंबीयांनी अवयवदानासाठी होकार दिला. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत यकृत आणि दोन मूत्रपिंड दान करण्यात येतील, अशी माहिती विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समितीला दिली. त्यानंतर या समितीने मार्गदर्शक तत्त्वे आणि निकषांनुसार दान आणि प्रत्यारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे कॉर्निया दान करण्यात आला. त्यामुळे या अवयवदानातून तिघांना जीवदान मिळाले.