पर्यटनवाढीसाठी प्रतिमा सुधारणे आवश्यक
शशी थरूर ः हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या कार्यक्रमात सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : एकीकडे लहान देश पर्यटनाच्या माध्यमातून मोठा महसूल कमावत आहेत, तर दुसरीकडे भारतात लाखो गोष्टी असतानाही त्या तुलनेत पर्यटन पुरेसे विकसित झालेले नाही. पर्यटनवाढीसाठी भारताची पायाभूत सुविधांबाबतची प्रतिमा सुधारणे गरजेचे आहे, असे मत खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केले.
हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया) त्यांचे ७५वे प्लॅटिनम ज्युबिली वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शशी थरूर म्हणाले, की पर्यटन आणि हॉटेल क्षेत्र हे केवळ अर्थकारणाचे चालक नसून, आपल्या देशाच्या आत्म्याचे आरसे आहेत. भारताच्या भूमीवर पाऊल ठेवणारा प्रत्येक प्रवासी हा आपण त्याच्यासोबत कसे वागलो, कसा व्यवहार केला या आठवणी तो सोबत घेऊन जातो. आपले २०४७ मध्ये विकसित भारतचे स्वप्न आहे. त्यासाठी आपण तत्काळ तीन गंभीर बाबींवर लक्ष दिले पाहिजे. यामध्ये आपली प्रतिमा सुधारणे, पुरेशी सुरक्षा आणि जुनाट दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे.
आपल्या पायाभूत सुविधा हॉटेल बांधणे म्हणजे झाले असे होत नाही. त्यासाठी आपल्याला केवळ हॉटेलची संख्या वाढवणे गरजेचे नाही. थायलंड, भूतान, सिंगापूर या राष्ट्रांनी काही छोट्या गोष्टींच्या आधारावर पर्यटन क्षेत्रात मोठी वृद्धी केली आहे. त्याप्रमाणे भारतानेदेखील प्रयत्न करणे आवश्यक आहे.
या माध्यमातून आपण जगाच्याही आठवणीत राहू. त्यामुळे केवळ विकसित राष्ट्र बनवण्यावर भर देऊ नका, तर स्वागत करणारा भारत तयार व्हायला हवा, अशी अपेक्षा थरूर यांनी व्यक्त केली.
७५ वर्षांचा वारसा
हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया)चे अधिवेशन हे केवळ ७५ वर्षांच्या वारशाचा उत्सव नाही, तर भारतीय आदरातिथ्याचे भविष्य घडवण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टीदेखील आहे.
देशातील पहिली हॉस्पिटॅलिटी असोसिएशन असण्यापासून ते त्यांचा सर्वात मजबूत उद्योग हा आमचा प्रवास आहे. तसेच व्यवसायांना दिवसाचे २४ तास काम करण्याची परवानगी देण्याचा सरकारचा अलीकडचा निर्णय हा एक धाडसी आणि दूरदर्शी पाऊल आहे, असे हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया)चे अध्यक्ष जिमी शॉ म्हणाले.