मुंबईकरांनो, आता एसटी बसस्थानकात करा पुस्तक वाचन
लवकरच सुरू होणार फिरते वाचनालय; पंतप्रधानांच्या पंच्याहत्तरीनिमित्त एसटीचा अनोखा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक आगळावेगळा, लोकाभिमुख आणि संस्कारमूल्ये जपणारा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील प्रमुख ७५ एसटी बसस्थानकांवर मोफत वाचनालय उभारून ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा दिवा जनतेसाठी प्रज्वलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला या तीन बस स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता बसस्थानकात पुस्तक वाचन करता येणार आहे. लवकरच हे वाचनालय सुरू होणार आहे.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या ३०९व्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयाची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार तसेच उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, की विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आकाराला आला आहे. पंतप्रधानांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘मोफत खुले वाचनालय’ उभारण्यात येणार आहे. ‘वाचन कट्टा’ मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपणारा ठरेल आणि समाजात वाचन संस्कृतीचा नवा सुवर्णप्रकाश पसरवेल, असेही ते म्हणाले.
वाचनालयांमध्ये कोणती पुस्तके
या वाचनालयांमध्ये वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, व. पु. काळे, विश्वास पाटील अशा नामवंत साहित्यिकांची पुस्तके उपलब्ध असतील. तसेच एमपीएससी, यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान संदर्भग्रंथ ठेवण्यात येणार आहेत.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त आम्ही जनतेसाठी ज्ञानाची ही ‘अनमोल भेट’ देत आहोत. वाचन संस्कृती आणि मराठी साहित्याचा प्रचार हा आमचा लोकाभिमुख उपक्रम आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.