सायबर गुलामीतून निसटले अन् छळछावणीत अडकले
म्यानमारमधून सुटकेसाठी ५०० भारतीयांची धडपड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : म्यानमारमधील अंतर्गत संघर्षाची संधी साधून तेथील बेकायदा कॉल सेंटरमधून सायबर गुलाम म्हणून राबणाऱ्या सुमारे ५०० भारतीयांनी पलायन केले. मायदेशी परतण्यासाठी त्यांनी थायलंड सीमेवरील निर्वासितांच्या छावणीत आश्रय घेतला; पण तेथे पुन्हा सायबर गुलाम व्हावे म्हणून त्यांचा छळ सुरू आहे. आगीतून फुफाट्यात अशी आमची अवस्था आहे, अशी आपबिती सुटकेसाठी धडपडणाऱ्या एका तरुणाने सांगितली.
छावणीत अडकलेल्या आणि आठवड्याहून अधिक काळ भारतीय दूतावास, भारतीय माध्यमांशी संपर्क साधून सुटकेसाठी धडपड करणाऱ्या विवेक बेर्डे (वय २८) या तरुणाशी ‘सकाळ’ने संपर्क साधला. त्या वेळी बेकायदा कॉल सेंटर आणि छावणीतील अत्याचारांना वाचा फुटली. या तरुणांना भारतात परत आणण्यासाठीच्या प्रक्रियेला आणखी दोन महिने लागतील, या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या उत्तराने आतापर्यंत तग धरलेल्या भारतीय तरुणांचा धीर सुटेल, अशी भीती विवेकने व्यक्त केली.
काही दिवसांपासून म्यानमार लष्कर या बेकायदा कॉल सेंटरवर छापा घालणार, हल्ला करणार अशा वावड्या उठत होत्या. सुटकेसाठी ही संधी असून काहीही झाले तरी या कैदेतून सहीसलामत निसटण्याचा निश्चय आम्ही सर्वांनी केला. आठवड्यापूर्वी आम्ही कैद असलेल्या कॉल सेंटरभोवती ड्रोन घोंघावले आणि लष्कराच्या भीतीने तेथील सशस्त्र पहारा पांगला. आम्हाला सर्वांना आपापल्या खोल्यांत जायला सांगितले. त्याच वेळी सर्व धीर एकवटून आम्ही कॉल सेंटरबाहेर पळ काढला, असे विवेकने सांगितले.
छावणीत प्रलाेभने अन् छळ
- कॉल सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर विवेकसह सारे थायलंड सीमेवरील म्यानमारच्या इमिग्रेशन कॅम्पमध्ये दाखल झाले. या छावणीतील सायबर गुन्हेगार आपल्या ‘कंपनी’साठी काम करण्यासाठी प्रलोभने दाखवत आहेत. चमचमीत जेवणाचे डबे, मधाळ वाणी ऐकायला मिळत आहे. होकार देणाऱ्यांना ट्रकमधून कॉल सेंटरमध्ये नेत आहेत, तर विरोध करणाऱ्यांना जेवणातून गोमांस दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार विवेकने उघड केला.
----
मूलभूत सुविधांचा अभाव
छावणीत दोन वेळचे जेवण, पाण्याशिवाय इतर कोणतीही मूलभूत सुविधा नाही. मोबाइल चार्ज करण्यापासून अंथरुणापर्यंतच्या व्यवस्थेसाठी पैशांची मागणी होते. चार्जिंगची व्यवस्था अपुरी आहे. येथे हाणामाऱ्या हाेत आहेत. रोज नवनव्या अफवा पसरवल्या जात आहेत.
------
पैसे संपण्याची प्रतीक्षा
पगारच तुटपुंजा असल्याने छावणीत अडकून पडलेल्यांच्या गाठीशी फारसे पैसे नाहीत. ते संपले की आपोआपच इच्छा नसताना पुन्हा सायबर गुलामीकडे वळण्याशिवाय अनेक तरुणांकडे पर्याय नाही. हे लक्षात घेऊन तशा हालचाली सुरू असल्याचे विवेकने सांगितले.
----
ते २०० तरुण कुठे गेले?
म्यानमारच्या छावणीतून तब्बल २०० तरुणांना तीन ते चार ट्रकमध्ये भरून नेण्यात आले. हे तरुण भारतात परतले की पुन्हा सायबर गुलामीत अडकले, याबाबत काहीच माहिती मिळत नाही, असा दावा विवेकने केला.
-----
असे होतात सायबर गुलाम
- परदेशी भरघोस पगाराच्या नोकरीचे प्रलाेभन दाखवून भारतीय तरुणांना टुरिस्ट व्हिसावर थायलंडला नेले जाते. विमानतळाबाहेर पडताच सशस्त्र गुंड धमकावून पासपोर्ट, मोबाइल जप्त करतात. नदीवाटे अवैधरीत्या म्यानमारमधील अवैध कॉल सेंटरमध्ये आणले जाते. तेथे रीतसर प्रशिक्षण देऊन या तरुणांना सायबर गुन्हे करण्यास भाग पाडले जाते.
----
सुटकेसाठी १० लाखांची मागणी
विरोध केल्यास मारहाण, उपासमार होते. सुटकेसाठी लाखो रुपयांची खंडणी मागितली जाते. मे महिन्यात या कैदेत असलेल्या विवेककडे सुटकेसाठी १० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचे त्याने सांगितले.
-----
पगार ३० हजार बाथ, देतात पाच हजारच!
कॉल सेंटरभाेवती सशस्त्र गुंडांचा गराडा असताे. संकुलाबाहेर जाण्याची परवानगी नसते. करारपत्रात ३० हजार बाथ (थायलंडचे चलन) इतका पगार नमूद असतो. महिन्यातून एक दिवस जरी एका मिनिटाचा उशीर झाला किंवा दोन्ही हात टेबलावर नसतील तर पगारातून चार हजार बाथ कापले जातात. त्यामुळे महिन्याकाठी पाच हजार बाथही हाती पडत नाहीत, असे विवेक म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.