‘अतिदक्षता’तील मृत्युदर २७ टक्क्यांवर
‘सेंट जाॅर्ज’मध्ये सर्वाधिक प्रमाण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : सेंट जॉर्ज रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील मृत्युदर यंदा २७ टक्क्यांवर गेला आहे. मागील दोन वर्षांत हा दर २३ टक्के होता. त्यात चार टक्के वाढ झाल्याने रुग्णालय प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनला आहे. अंतिम क्षणी गंभीर अवस्थेत रुग्ण दाखल हाेत असल्यामुळे मृत्युदर वाढल्याचे प्रमुख कारण असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
आरटीआय कार्यकर्ते अॅड. तुषार भोसले यांनी २०२२ ते २०२५पर्यंत रुग्णालयाच्या आयसीयूत दाखल झालेल्या रुग्णांची संख्या, किती जणांचा मृत्यू झाला आणि डॉक्टरांचा सल्ला नसतानाही किती जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले, याची माहिती मागितली होती. २०२२मध्ये एकूण ३१९ रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ८० (२५ टक्के) रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २०२३मध्ये ५८७ रुग्णांपैकी १३६ (२३ टक्के) रुग्णांचा मृत्यू झाला. २०२४मध्ये आयसीयूमध्ये दाखल झालेल्या ८०२ रुग्णांपैकी १८६ (२३ टक्के) रुग्णांचा मृत्यू झाला. २०२५मध्ये जुलैपर्यंत एकूण ४४४ रुग्णांपैकी ११९ (२७ टक्के) रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती रुग्णालयाने स्पष्ट केली. सरासरी दरवर्षी सात ते आठ टक्के रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध रुग्णालयातून डिस्चार्ज मागतात, अशीही माहिती दिली.
आयसीयूमध्ये गंभीर रुग्ण येतात. त्यातील १५ ते २० टक्के मृत्यू होतात. २७ टक्के मृत्युदर हा रुग्णालयाला पुनर्विचार करण्यास भाग पाडणारा आहे. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये फक्त दोन निवासी डॉक्टर आणि एका इंटर्नसह कर्मचारी असणे हेदेखील मृत्युदर वाढण्यास कारणीभूत असू शकते. त्यामुळे तज्ज्ञांची नियुक्ती आवश्यक आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
-------
रुग्णाला परत पाठवत नाही
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर म्हणाले, ‘आम्ही कोणत्याही रुग्णाला, त्यांची स्थिती कितीही गंभीर असली तरीही परत पाठवत नाही. कधी कधी रुग्ण इतर ठिकाणांहून किंवा आर्थिक अडचणी अनुभवल्यानंतर आमच्याकडे येतात. यापैकी अनेक रुग्णांचा २४ तासांच्या आत मृत्यू हाेताे.’
--------
बेड आणि मनुष्यबळ
सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ११ बेड आहेत. दोन निवासी डॉक्टर हे ८ ते १२ तास रोटेशनमध्ये काम करतात. मृत्युदर कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
----
अतिदक्षता विभागातील मृत्यू
वर्ष : मृत्यू : टक्के
२०२२ : ८० : २५ टक्के
२०२३ : १३६ : २३ टक्के
२०२४ : १८६ : २३ टक्के
२०२५ : ११९ : २७ टक्के (जुलैपर्यंत)
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.