अनिल अंबानींमुळे येस बँकेला नुकसान
२,७०० कोटींचा फटका; सीबीआयचा आरोपपत्राद्वारे दावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः उद्योगपती अनिल अंबानींच्या वित्तीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या सहसंस्थापक राणा कपूर यांच्या एकतर्फी निर्णयामुळे येस बँकेला सुमारे २,७०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा दावा सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. येस बँक आणि अंबानीच्या कंपन्यांमधील कथित फसव्या व्यवहारांशी संबंधित प्रकरणात सीबीआयने नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे. येस बँकेच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या दोन वेगवेगळ्या तक्रारींच्या आधारे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीबीआयने याप्रकरणी अनिल अंबानी, राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह १३ जण तसेच संस्थांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. कर्ज आणि गुंतवणुकीशी संबंधित गुन्हेगारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा आरोप या सगळ्यांवर ठेवला आहे. या प्रकरणात अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी यांच्या भूमिकेबाबत पुढील तपास सुरू असल्याचेही सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे.
राणा कपूर व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असताना बँकेने २०१७ ते २०१९ दरम्यान अनिल अंबानीच्या एडीए समूहाच्या वित्तीय कंपन्यांमध्ये ५,०१० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीत रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या (आरएचएफएल) नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्समध्ये (एनसीडी) २,९६५ कोटी रुपये आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडच्या (आरसीएफएल) कमर्शियल पेपर्समध्ये २,०४५ कोटी रुपये समाविष्ट होते. एकूण रकमेपैकी ३,३३७.५ कोटी रुपये डिसेंबर २०१९ पर्यंत नॉन परफॉर्मिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये (एनपीआय) रूपांतरित झाले, असा दावाही आरोपपत्रात करण्यात आला आहे. या गुंतवणुकींवरील हमीमधून बँक संपूर्ण उत्पन्न वसूल करू शकली नाही आणि त्यामुळे २,७९६.७७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही आरोपपत्रात म्हटले आहे.
----
अनिल अंबानींकडून याचिका मागे
रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडला (आरकॉम) दिलेल्या ७५० कोटी रुपयांच्या कर्जासंदर्भात आयडीबीआय बँकेच्या कारवाईविरुद्ध दिलासा मागण्यासाठी उच्च न्यायालयात केलेली याचिका उद्योगपती अनिल अंबानी यांनी मागे घेतली. अंबानींच्या याचिकेवर नुकतीच न्या. संदेश पाटील यांच्या सुट्टीकालीन एकलपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी अंबानी यांना कोणताही तात्पुरता दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर, अंबानी यांच्या सूचनेनुसार याचिका मागे घेत असल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.