‘एल्फिन्स्टन’ पाडकामामुळे विक्रेत्यांचे नुकसान
व्यवसायात ७० टक्क्यांनी घट; उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : प्रभादेवी येथील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडून दीड महिना उलटला. दरम्यान, या ठिकाणी वर्षानुवर्षे छोटा-मोठा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांचे खूप मोठे नुकसान झाले. त्यांच्या व्यवसायावर हा पूल पाडल्याने खूप मोठा परिणाम झाल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले.
धंदा लावण्यासाठी जागेची समस्या, जागा मिळाली तरी सामान घेऊन होणारी धावपळ, पोलिस व पालिका अधिकाऱ्यांचा दबाव, प्रशासन माल उचलून घेऊन गेले तर त्यासाठी करावी लागणारी विनवणी या सर्व समस्यांना येथील विक्रेत्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे ७० टक्के धंद्यांचे नुकसान झाले आहे. पूर्वी दिवसाला इथल्या व्यावसायिकांची दोन ते तीन हजार रुपयांची कमाई व्हायची; पण आता पूल पाडल्यापासून ४०० ते ५०० रुपये कमावणेही कठीण झाल्याचे इथले स्थानिक व्यावसायिक सांगतात. कीर्ती महल ते परळ स्थानकापर्यंत जवळपास १०० हून अधिक छोटे व्यावसायिक होते, पण आता या ठिकाणी १० ते १२ जण व्यवसाय करतात.
मला आता ७२ वर्षे पूर्ण झाली. आमची चौथी पिढी हा व्यवसाय करतेय. एल्फिन्स्टन पूल पाडल्याने आमच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला आहे. व्यवसाय करण्यासाठी जागा राहिली नाही. या बोगद्यामध्ये आठ कुटुंबे राहायची. आता तात्पुरते पत्रे काढले तर पूर्णपणे व्यवसाय बंद होईल. ५० वर्षांपासून सीझनल व्यवसाय सुरू आहे. दिवसाला तीन हजार रुपयांचा व्यवसाय व्हायचा. आता ५००-६००ही होत नाही. कीर्ती महल ते परळ स्थानकांपर्यंत १०० हून अधिक व्यावसायिक होते. इथल्या रहिवाशांना मानखुर्दला पाठवले गेले. आम्हाला बाजारात कुठे तरी पर्यायी व्यवस्था दिली पाहिजे.
- माया दत्ताराम डोईफोडे, व्यावसायिक आणि स्थानिक
लिंबूपाणी विकण्याचा व्यवसाय आम्ही करतो. पूल तोडल्यापासून व्यवसाय कमी झाला आहे. आता जागा मिळत नसल्याने खूप धावपळ होते. पूर्वी दिवसाला २,००० ते २,५०० रुपये व्यवसाय होत होता. आता हजार रुपये होणेही मुश्किल आहे. यापूर्वी खूप गर्दी असायची. २०१७ नंतर इथल्या व्यवसायाचे प्रमाण कमी झालेच. कारण एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरी दुर्घटना घडली. तेव्हापासून विक्रेत्यांना हटवायला सुरुवात झाली. आता इथे राहणारेच व्यवसाय लावतात.
- कल्याणी उंब्रसकर, विक्रेता, परळ
पूल पाडल्यानंतर आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय कमी होत असला तरी आम्ही काही तासांसाठी का होईना आमचे दुकान लावतो. स्थानिक प्रशासनाने आता आम्हाला मानखुर्दला घरे दिली. तिथून आम्हाला दररोज प्रवास करून इकडे यावे लागते. किमान पाच वर्षे तरी हा पूल पुन्हा बांधण्यासाठी लागतील. आधी २,००० रुपये तरी कमाई व्हायची. आता ती ४०० ते ५०० रुपयांवर आली आहे. आम्ही डबा-बॉटल विकण्याचा व्यवसाय २५ वर्षांपासून करीत आहोत. टाटा, केईएम आणि आजूबाजूला रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना आम्ही कमी किमतीत वस्तू विकतो.
- भावना प्रकाश पवार, विक्रेती, परळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.