महापालिकेच्या जलदेयक वितरणाचा खर्च वाढला; टपाल खात्याचे दर वाढले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः महापालिकेच्या जलदेयकांचे वितरण भारतीय टपाल खात्यामार्फत करण्यात येते; मात्र टपाल खात्याने दरवाढ केल्याने या कामाचा खर्च वाढला असून महापालिकेने सुधारित अंदाजपत्रक प्रस्तावित केला आहे.
महापालिका दररोज सुमारे पाच हजार जलदेयके तयार करून ती ग्राहकांना टपालाने पाठवते. यासाठी पालिकेने भारतीय टपाल खात्याशी पाच वर्षांचा करार केला होता. हा करार १ मे २०२४ ते ३० एप्रिल २०२९ या कालावधीसाठी असून, त्या वेळी प्रति देयक दर ३.८० रुपये इतका ठरवण्यात आला होता; मात्र टपाल खात्याने १६ डिसेंबर २०२४ पासून दर वाढवून प्रति देयक पाच रुपये इतका केला आहे. त्यासोबत फ्रॅंकींग, हँडलिंग आणि पिनकोड वर्गीकरणाचे शुल्क ०.८० आणि १८ टक्के जीएसटी लागू राहील. त्यामुळे प्रतिदेयक एकूण ५.९४ रुपये इतका खर्च येणार आहे.
या दरवाढीनंतर जलदेयक वितरणाचा एकूण खर्च ४.६२ कोटींवरून वाढून ५.३४ कोटी इतका होणार आहे. म्हणजेच सुमारे ७२ लाखांची वाढ झाली आहे. महापालिकेने सांगितले, की हा वाढीव दर असूनही भारतीय टपाल खात्याचा दर खासगी कुरिअर सेवांपेक्षा स्वस्त आहे. उदाहरणार्थ, खासगी डीटीडीसी कुरिअरचा दर १३.५० रुपये प्रति देयक आहे.
सुधारित खर्चाची तरतूद मनपाच्या २०२५-२६च्या अर्थसंकल्पातून करण्यात येणार आहे. जलदेयक वितरणाचे काम मात्र भारतीय टपाल खात्याकडेच सुरू राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.