ट्रॅव्हल्सचालकांना दिवाळीत प्रवाशांची लूट महागात
मुंबईत १७० वाहने दोषी, ५.९० लाखांचा दंड वसूल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने मुंबईतील अनेक नोकरदार, विद्यार्थी आपल्या गावी जातात. या काळात प्रवाशांना खासगी बसमध्ये प्रवास करण्यासाठी नियमित दरापेक्षा अधिकचे पैसे द्यावे लागले. अशा १७० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५.९० लाखांची दंडवसुली करण्यात आली आहे.
मुंबईतील आरटीओ कार्यालयांनी १८ ते २४ ऑक्टोबरदरम्यान प्रवासी वाहन तपासणी मोहीम राबवत ५०० हून अधिक वाहनांची तपासणी केली आहे. विशेषतः दिवाळीमध्ये जादा भाडे आकारणी करणाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्यात आली आहे.
प्रत्येक वर्षी दिवाळीत प्रवासी वाहतूक वाढते. परजिल्ह्यातून नागरिक दिवाळीसाठी गावी येतात. बसगाड्या हाउसफुल्ल असतात. मुंबईवरून रेल्वे आणि बसचे आरक्षण मिळत नाही. बसचे आरक्षण मिळाले नाही, तर खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो. ही परिस्थिती ओळखून खासगी ट्रॅव्हल्सचालक अतिरिक्त तिकीटदर आकारून प्रवाशांची लूट करत असल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी मोहीम राबवून ट्रॅव्हल्ससह इतर वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला. एसटी महामंडळाच्या बस भाड्याच्या दीडपटीपेक्षा अधिक भाडे आकारू नये, असे आवाहन आरटीओ स्नेहा मेंढे यांनी केले आहे. वाहने चालवताना नागरिकांनी आपल्यासोबत वाहनांची कागदपत्रं सोबत ठेवणे गरजेचे आहे अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
१८ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत प्रवासी वाहनांची तपासणी मोहीम राबवली जात आहे. तपासणीदरम्यान प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारल्याचे आढळून आले. त्या सर्व प्रवाशांना अतिरिक्त तिकीट म्हणून आकारलेले पैसे ट्रॅव्हल्समालकांकडून प्रवाशांना परत मिळवून दिले.
आरटीओच्या पथकांनी राबवली मोहीम
* दिवाळीत खासगी बसच्या तपासणीसाठी दोन ते तीन पथकांची स्थापना करण्यात आली होती.
* पथकाकडून बाहेरगावाहून येणाऱ्या व बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात आली. त्रुटी आढळणाऱ्या ट्रॅव्हल्समालकांवर कारवाई करण्यात आली.
तपासणीदरम्यान वाहनधारकाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येतो आहे. त्यामुळे वाहनचालकांनी कागदपत्रे सोबत बाळगण्याचे आवाहन आरटीओने केले आहे.
दिवाळी विशेष मोहीम
तपासलेली वाहने - ५९०
दोषी वाहने - १७०
तडजोड शुल्क वसूल - ५ लाख ९१ हजार ५००
कोणकोणत्या कारणांमुळे कारवाई?
जादा भाडे आकारणे, सीटबेल्ट नसणे, परमिट नसणे, पासिंग नाही, रिफ्लेक्टर नाही, वाहनाची कागदपत्रे नाहीत, यांसह इतर कारणांवरून संबंधित ट्रॅव्हल्समालकांना दंड आकारण्यात आला आहे. तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होत आहे.