मुंबई ‘डेंगी, मलेरियाचा हॉटस्पॉट’
राज्याभरात ३९,७१८ रुग्णांची नोंद; ३८ जणांचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : राज्यात अनियमित पाऊस, साचलेले पाणी आणि बदलते हवामान या कारणांमुळे डासांची उत्पत्ती वाढली असून, मलेरिया, डेंगीसह चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दुसरीकडे मुंबई महानगर हे या आजारांचे हाॅटस्पाॅट ठरत आहे.
राज्यभरात यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. या कालावधीत हवामानात सातत्याने बदल होत असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले. राज्यातून मॉन्सून परतला असला तरी सध्या साथीच्या आजारांचा प्रकोप सुरूच आहे. यामध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क असली तरी राज्यभरात विविध जिल्ह्यांत डेंगी, मलेरिया, स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस, चिकुनगुनिया आणि जलजन्य आजारांचे ३९,७१८ रुग्ण नोंदविले गेले असून, ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. मलेरिया व डेंगी या डासजन्य रोगांनी ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ७ नोव्हेंबरपर्यंत राज्यात मलेरियाचे २०,१६६ रुग्ण आणि १५ मृत्यू, तर डेंगीच्या १२,३५१ रुग्णांची नोंद झाली.
मुंबईत सर्वाधिक रुग्ण
मुंबईत जानेवारीपासून मलेरियाचे तब्बल ८,६९७ आणि डेंगीचे ५,२४६ रुग्ण नोंदले गेले आहेत. यामध्ये चिकुनगुनियाचे ७२६ रुग्ण असून, या आजारांमध्ये मुंबईचा वाटा सर्वाधिक आहे. शहरातील घनदाट लोकसंख्या, ओलसर हवामान आणि साचलेले पाणी यामुळे डासांची पैदास वाढली असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
आजार जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर
मलेरिया ८८४, १,२९४, १,५५५, १,७१४, ६८०
लेप्टो ३६, ४३ , २२७, १३९, , ३२
चिकुगुनिया २१ , १२९ , २२०,१४३, १२०
डेंगी १०५, ७०८, १,१५९, १,३८४, ७३७
गॅस्ट्रो ९३६, ६६९ , ५९२, ४४४,
हिपॅटायटीस ७८ , २५६, १९७, १७६
इतर जिल्ह्यांचीही स्थिती चिंताजनक
गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे ६,०८८ रुग्ण आढळले आहेत. डेंगीचे नाशिकमध्ये ५७६ आणि ठाण्यात ४८८ रुग्ण नोंदले गेले. चिकुनगुनियाचे पालघरमध्ये ३४३ आणि पुण्यात २३५ रुग्ण आहेत. लेप्टोस्पायरोसिसचे ८१० रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर स्क्रब टायफसच्या २८१ प्रकरणांमध्ये नऊ जणांचा बळी गेला आहे. याशिवाय, जलजन्य आजारांमध्ये कॉलरा १९१, पिवळा ताप ६८७, गॅस्ट्रोएन्टरायटिस ४३, अतिसार १,२३४ आणि टायफॉईड २२ रुग्ण आढळले आहेत. राज्यात बर्ड फ्लूचेही ७३ प्रकरणे नोंदली गेली आहेत.
आरोग्य विभागाचा सात सूत्री आराखडा
राज्य आरोग्य विभागाने डेंगी, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी सात सूत्री आराखडा तयार केला आहे. यात जलद सर्वेक्षण, तपासणीचा विस्तार, कीटक नियंत्रण, फॉगिंग, जनजागृती मोहीम, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि विशेष स्वच्छता मोहिमांचा समावेश आहे. तसेच, स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस, स्क्रब टायफस, इन्फ्लुएंझा व बर्ड फ्लूवरील नियंत्रणासाठी स्वतंत्र कृती आराखडे तयार करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक डाॅ. कैलास बाविस्कर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.