डॉ. मीनाक्षी पाटील यांच्या कवितांत स्त्रियांच्या भावजीवनाचा शोध
‘ललद्यदस् ललबाय’ कवितांचे वामन पंडितांकडून मंत्रमुग्ध करणारे अभिवाचन
मुंबई, ता. १९ : कवयित्री डॉ. मीनाक्षी पाटील यांच्या ‘ललद्यदस् ललबाय’ कवितासंग्रहातल्या कवितांमध्ये मांडण्यात आलेली स्त्री प्रतिमांची, त्यांच्या भावविश्वांची दृष्टी, पलीकडची सृष्टी, दृश्यमान करण्याचे काम मला या अभिवाचनातून करण्याची संधी मिळाली. डॉ. पाटील यांच्या कवितांनी स्त्रियांच्या भावजीवनाचा शोध घेतला आहे. त्यांच्या कवितेतून झालेले आकलन अभिवाचनातून मांडण्याचा प्रयत्न आपण केला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित यांनी केले.
कवयित्री आणि चित्रकार डॉ. मीनाक्षी पाटील यांच्या ‘ललद्यदस् ललबाय’ या काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे अभिवाचन ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित यांनी करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रभादेवी येथील पु. ल. अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये हा प्रयोग सादर झाला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार, साहित्यिक, विचारवंत यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने प्रकाशक रामदास भटकळ, मोनिका गजेंद्रगडकर, नाटककार प्रेमानंद गज्वी, लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, संभाजी सावंत, संध्या नरे-पवार आणि माजी खासदार कुमार केतकर आदी उपस्थित होते.
डॉ. मीनाक्षी पाटील यांच्या कवितांनी स्त्रियांच्या भावजीवनाचा आणि त्यांच्या अस्तित्वाच्या शोधाचा सखोल वेध घेतला आहे. कवितेतील स्त्रीकेंद्री विचार, तिच्या जाणिवांचे तुटलेपण, गोठलेपण आणि हजारो वर्षांपासून नाकारलेल्या स्त्री अस्तित्वाचे ‘आरपार उत्खनन’ या कवितेने केले आहे. या उत्खननातून सापडलेले पोकळ सांगाडे या कवितेने वाचकांसमोर ठेवले असल्याचे वामन पंडित म्हणाले तसेच या अभिवाचनामुळे कवितांमधील स्त्री प्रतिमा, त्यांचे भावविश्व आणि अस्तित्वाचे विविध कंगोरे दृश्यमान करण्याची संधी मिळाली, असल्याचेही त्यांनी सांगितले.