गोवंडी, मानखुर्दमध्ये मुले विक्रीचा धंदा जोरात
अनेक टोळ्या सक्रिय; गुन्ह्याला सामाजिक, आर्थिक किनार असल्याचा पोलिसांचा दावा
मुंबई, ता. १९ : गोवंडी, मानखुर्द या दाट लोकवस्तीच्या उपनगरांत भूमाफियांपासून पाणी, वीजचोरीसह विविध प्रकारच्या गुन्हेगारी टोळ्या अस्तित्वात आहेत. गेल्या काही वर्षांत या वलयात नवजात मुलांना विकणाऱ्या टोळ्यांची भर पडली आहे. प्रत्येक प्रकरणे तपासणाऱ्या पोलिसांच्या दृष्टिकोनातून या गुन्ह्याला सामाजिक, आर्थिक बाजू आहे.
तीन महिन्यांच्या अंतराने गोवंडीच्या शिवाजीनगर वस्तीत २० वर्षांच्या अविवाहित तरुणीने जन्माला घातलेले बाळ प्रसूती करणाऱ्या डॉक्टरने, परिचारिका आणि अन्य साथीदारांच्या मदतीने पाच लाखांत विकण्याचा प्रयत्न केला. याची कुणकुण लागताच वरिष्ठ निरीक्षक अनघा सातवसे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस पथकाने हा प्रयत्न हाणून पाडला. डॉक्टरसह सर्वांवर गुन्हा नोंदवला. डॉक्टर आणि परिचारिकेस बेड्या ठोकल्या.
ऑगस्ट महिन्यात घडलेले प्रकरण आणि या ताज्या प्रकरणात मूल विक्री हा समान धागा असला तरी त्यामागील परिस्थिती भिन्न आहे. पहिल्या प्रकरणात दाम्पत्यास तीन मुले होती. त्यावर चौथे झाले. हे मूल विकून परिस्थिती सुधारेल, या विचाराने दाम्पत्यानेच स्वतःच्या इच्छेने या गुन्ह्यात सहभाग घेतला होता. त्या प्रकरणात दाम्पत्यासह परिचारिका, मूल विक्री टोळीतील सक्रिय आरोपींना अटक करण्यात आली होती.
ताज्या प्रकरणात २० वर्षीय अविवाहित तरुणी प्रेमसंबंधातून गरोदर राहिली. तिला हे मूल नको होते. तिला पैशांची आस नव्हती. तिला फक्त या अडचणीतून मुक्तता हवी होती. गोवंडीच्या रॉयल हॉस्पिटलमध्ये डॉ. कयामुद्दीन खान यांनी तिची यशस्वी प्रसूती केली. विशेष म्हणजे प्रसूती करण्याआधी व नंतर बंधनकारक असलेल्या नोंदी त्यांनी केल्या नव्हत्या. त्यावरून डॉ. खान यांनी मूल विक्रीच्या उद्देशाने आधीच कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. या तरुणीची परिस्थिती माहीत असल्याने त्यांनी परस्पर प्रसूती करून ते बाळ पाच लाखांत विक्रीस काढले. या प्रकरणात डॉ. खान आणि परिचारिका अनिता सावंत यांना अटक करण्यात आली. मूल चोरी, विक्री करणाऱ्या टोळीतील तिघांचा शोध पोलिस घेत आहेत.
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही प्रकरणांत सहभागी टोळ्या भिन्न आहेत. गोवंडी, मानखुर्द या दाट लोकवस्तीच्या उपनगरामध्ये ९९ टक्के नागरिकांचे हातावर पोट आहे. उत्तर प्रदेश, बिहारसह अन्य राज्यांतून स्थलांतरित श्रमिकांच्या या वस्तीत कोणाला मूल नको असते, तर कोणाला ते विकून आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी आशा असते. ही मानसिकता हेरून नवजात बालके लाखो रुपयांना विकणाऱ्या अनेक टोळ्या या भागात अस्तित्वात आहेत, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
या टोळ्यांचे सदस्य येथील खासगी, शासकीय प्रसूतिगृहांतून, विविध वस्त्यांतून गरोदर महिलांची, त्यांच्या आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीची इत्थंभूत माहिती काढतात. त्यांच्या कुटुंबीयांना गाठून मूल विक्री, त्यातून होणारा आर्थिक फायदा गळी उतरवतात. ताज्या घटनेप्रमाणे अनेकांना मुलगा असो वा मुलगी अपत्य नकोच असते. अनेकांना मुलगाच हवा असतो. काहींना होणारे मूल विकायचे, असे स्वतःच निश्चित केलेले असते. दुसरीकडे संघटित टोळ्या अपत्य न होणाऱ्या दाम्पत्याची माहिती आयव्हीएफ केंद्रांमधून काढतात आणि दोन्ही बाजूंना विश्वासात घेऊन सौदा करतात. पालकांच्या स्वेच्छेने घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांना वाचा फुटत नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दाखल गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात एका डॉक्टरचा समावेश आहे. या डॉक्टरचा अशाप्रकारच्या अन्य गुन्ह्यांत सहभाग होता का, याबाबत तपास सुरू आहे. या प्रकरणात सहभागी अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
- अनघा सातवसे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.