अंधेरीचे सेवन हिल रुग्णालय खासगीकरणाला स्थानिकांचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः अंधेरी पूर्व मरोळ येथील पालिकेच्या सेवन हिल्स रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून, रुग्णालयाच्या खासगीकरणाला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे.
रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात स्थानिकांनी अंधेरी विकास समिती समिती ही संघटना स्थापन केली असून, यात सर्वपक्षीय नागरिकांचा सहभाग आहे. सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच स्थानिकांनी एकत्र येत खासगीकरणाविरुद्ध नुकतेच आंदोलन केले. रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीचे कार्याध्यक्ष दिलीप माने यांनी दिला आहे.
पालिकेने कॅन्सर रुग्णांसाठी या जागी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. १९९२ साली या रुग्णालय इमारत बांधण्यासाठी तत्कालीन महापौर चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. पालिकेने बांधकामाला सुरुवातही केली होती, पण निधीअभावी हे रुग्णालय बांधून चालविण्यासाठी विशाखापट्टणम येथील सेवन हिल्स या संस्थेला देण्यात आले होते. २०१०मध्ये हे रुग्णालय बांधून रुग्णांच्या सेवेसाठी खुले झाले होते. परंतु व्यवसायातील नुकसानीमुळे ती संस्था दिवाळखोरीत गेली. त्यामुळे संस्था पालिकेचे पैसे देऊ शकली नाही. त्यामुळे पालिकेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे २०२०मध्ये या रुग्णालयाचा ताबा पालिकेकडे आला आहे. कोविडच्या काळात या रुग्णालयाचा वापर रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेला झाला होता, अशी माहिती कार्याध्यक्ष माने यांनी दिली.
सेवन हिल्स या रुग्णालयाचा फायदा अंधेरीसह मुंबई शहरातील गरीब रुग्णांना झाला आहे. आता हे रुग्णालय खासगी उद्योगपतीला देण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याला आमचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.