मुंबईत ‘मतचोरी’चा मुद्दा गाजणार!
याद्यांचा गोंधळ उघडकीस आणण्याची विरोधकांची मोहीम जोरात
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः महापालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा दुबार आणि बोगस मतदारांचा मुद्दा प्रचंड गाजू लागला आहे. राज्यभर हा वाद पेटवल्यानंतर आता हा मुद्दा थेट मुंबईत पोहोचला असून, सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने मतदार याद्यांचा गोंधळ उघडकीस आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने यामुळे राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापणार आहे.
सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी स्वतः घाटकोपर पूर्व मतदारसंघातील मतदार याद्यांची तपासणी करून जवळपास सात हजारांहून अधिक दुबार आणि बोगस नावे असल्याचा दावा केला. याची यादी, पुरावे आणि तक्रार घेऊन त्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेटही घेतली. निवडणूक आयोग फक्त भाजपचेच काम करतो का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. महापालिका निवडणुकीत हा मुद्दा प्राधान्याने उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
काँग्रेसने तर हा मुद्दा लावून धरला आहे. राहुल गांधी देशभर या विषयावर मोहीम राबवत असून, त्यांनी मतदार याद्यांमधील मोठा गोंधळ उघड केला आहे. मुंबई काँग्रेसही प्रत्येक प्रभागातील मतदार यादीची सूक्ष्म तपासणी करत असून, बोगस आणि दुबार नावे शोधण्यासाठी स्वतंत्र पथक कामाला लावले आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दुबार आणि बोगस मतदारांविरोधात सखोल कारवाईची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी निवडणूक आयोगाने यावर निर्णय घेतल्याशिवाय निवडणुका जाहीर करू नयेत, अशी मागणी करत, गरज पडल्यास न्यायालय व निवडणूक बहिष्कार याचाही पर्याय असल्याचे सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट आकडे टेबलावर ठेवत दावा केला, की राज्यात ९६ लाख बोगस मतदार आहेत. अशी यादी ठेवून निवडणुका घेणे म्हणजे ‘फिक्स मॅच’ आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी सत्याचा मोर्चा काढत निवडणूक आयोगाला मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ करण्याची मागणी केली असून, मनसे कार्यकर्त्यांना घराेघरी जाऊन यादी पडताळणीचे आदेश दिले आहेत.
महाविकास आघाडीकडून हा मुद्दा जाहीरपणे उचलला जात असल्याने, भाजपनेही यामध्ये उडी घेतली आहे; मात्र भाजप नेते आपल्या पद्धतीने महाविकास आघाडी नियंत्रित भागांतील दुबार मतदारांना लक्ष्य करीत आहेत. मंत्री आशीष शेलार यांनी काही क्षेत्रांत राजकीय हेतूने मतदार वाढवल्याचा आरोप केला आहे. हा मुद्दा शिवसेना (ठाकरे) आणि मनसे निवडक पद्धतीने वापरतात, असे त्यांनी म्हटले. यामुळे स्पष्ट झाले आहे, की निवडणूक म्हणजे फक्त राजकीय लढत नाही, तर ‘मतदार यादी स्वच्छतेची’ मोठी परीक्षा ठरणार आहे. सगळ्या पक्षांनी हा मुद्दा शिगेला नेल्याने, येत्या निवडणुकांमध्ये मतचोरी, दुबार मतदार, यादीतील गोंधळ, मतदारांना रोखून दाखवण्याची मोहीम हे शब्द प्रचंड गाजणार आणि राजकीय वातावरण तापणार हे निश्चित!
काँग्रेसची रणनीती
निवडणूक आयोग कारवाई करणार नाही, म्हणून आम्हीच ही नावे शोधून मतदानाच्या वेळी बोगस आणि दुबार मतदारांना रोखू, अशी रणनीती मुंबई काँग्रेसने आखली आहे, असे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी सांगितले.
शाखांना लावले कामाला
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक शाखेला मतदार यादी छाननीचे आदेश दिले आहेत. पुरावे गोळा करून आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
मनसेस्टाइल उत्तर देणार
मनसेने मतचोरीविरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मतदानाच्या दिवशी बोगस मतदार पकडला तर मनसेस्टाइलने उत्तर मिळेल, असा इशारा दिला आहे.
भाजपकडून मुस्लिम मतदार लक्ष्य
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी काही भागांत मतचोरी होत असल्याचा आरोप करीत प्रशासनाला कठोर छाननीची मागणी केली आहे; मात्र त्यांनी अनेक भागातील मुस्लिम मतदारांना लक्ष्य करून महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.