मुंबईत डिसेंबरमध्ये ग्लोबल युथ फेस्टिव्हल
मुंबई, ता. २२ : शहरातील तरुणांसाठी ६ आणि ७ डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डन, वांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद् राजचंद्र मिशन यांच्या सहकार्याने ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा व युवक कल्याणमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यामध्ये १० हजारपेक्षा जास्त तरुण मन:शांती, ॲडव्हेंचर, आर्ट्स, कल्चर, संगीत, योग-ध्यान, समाजाभिमुख उपक्रम आणि (स्किल-बिल्डिंग) कौशल्य विकास यांसारख्या अनोख्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सहकार्याने, हा देशातील आघाडीचा युवक उत्सव ठरणार आहे. आत्मपरिवर्तनातून समाजपरिवर्तन घडवण्यासाठी हा उत्सव तरुणांची चळवळ म्हणून उभी राहील. लंडन आणि पुण्यासारख्या शहरानंतर ग्लोबल युथ फेस्टिव्हल या वर्षी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. ग्लोबल युथ कम्युनिटी ही २०पेक्षा जास्त देशांमध्ये आणि १७०पेक्षा जास्त शहरांमध्ये पसरलेली तरुणांची एक प्रेरणादायी चळवळ आहे. क्रिएटर्स, व्यावसायिक, कलाकार, उद्योजक आणि चेंजमेकर यांनी एकत्रित येऊन ग्लोबल युथ कमिटी तयार केली आहे.