संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे फेस रिडिंगद्वारे सर्वेक्षण
बायोमेट्रिक न झालेल्यांना खुशखबर; २,५०० रहिवाशांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात राहणाऱ्या मूळ रहिवाशांची ओळख पटवण्याबरोबरच घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने बायोमेट्रिक सर्वेक्षण हाती घेतले होते. हे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असले तरी सुमारे २,५०० जणांच्या बोटांचे ठसे मशीनमध्ये न आल्याने त्यांचे सर्वेक्षण पूर्ण होऊ शकले नव्हते, मात्र त्यांच्यासाठी आता खुशखबर असून ज्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण होऊ शकलेले नाही त्यांच्यासाठी फेस रिडिंगचा पर्याय दिला जाणार असून, त्याबाबतची अपडेट सॉफ्टवेअरमध्ये केली जाणार आहे.
म्हाडाची मुंबई शहर आणि उपनगरांत ३४ ठिकाणी संक्रमण शिबिरे असून, त्यामध्ये २० हजार सदनिका आहेत. उपकरप्राप्त इमारती धोकादायक झाल्यानंतर त्यामधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था या संक्रमण शिबिरात म्हाडाकडून केली जाते. मात्र गेल्या तीन-चार दशकांपासून अनेक रहिवासी या संक्रमण शिबिरात वास्तव्यास असून अद्याप त्यांना पुनर्रचित इमारतीत घर मिळालेले नाही. तसेच अनेकांनी आपल्या संक्रमण सदनिका परस्पर विकल्या आहेत, तर काही ठिकाणी घुसखोरांनी बेकायदा संक्रमण सदनिकांचा ताबा घेतला आहे.
संक्रमण शिबिरात मूळ भाडेकरू कोण आहे, कोण घुसखोर आहे यानुसार रहिवाशांचे अ, ब आणि क याप्रमाणे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने म्हाडामार्फत फेब्रुवारीपासून रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत १७ हजारांहून अधिक रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र जवळपास अडीच हजार रहिवाशांच्या हाताचे ठसे व्यवस्थित न उमटल्यामुळे या रहिवाशांचे पुन्हा एकदा फेस रिडिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यासाठी सर्वेक्षण साॅप्टवेअरमध्ये आवश्यक बदल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील पंधरा दिवसांत काम सुरू होणार आहे. त्यामुळे अद्याप सर्वेक्षण न झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दीड हजार रहिवाशांच्या घराला कुलूप
बायोमेट्रिक सर्वेक्षणाला प्रतिसाद न देणाऱ्या रहिवाशांना घुसखोर ठरवणार, असा इशारा म्हाडाने दिला तरी अजूनही काही रहिवासी सर्वेक्षणाला प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वेक्षणाची टीम दाखल होताच घराला कुलूप लावून गायब होणाऱ्या रहिवाशांचा आकडा जवळपास दीड हजारांच्या घरात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ते घुसखोर तर नाहीत ना, असा म्हाडाला संशय आहे.
असे आहे वर्गीकरण
‘अ’ प्रवर्गात मूळ रहिवासी ज्यांना संक्रमण शिबिरामध्ये स्थानांतरण करण्यात आलेले आहे. ‘ब’ प्रवर्गात असे रहिवासी ज्यांनी मुखत्यारपत्र किंवा तत्सम प्राधिकार पत्राद्वारे मूळ रहिवाशांकडून संक्रमण शिबिरातील गाळ्यांचा हक्क घेतला आहे. तसेच ‘क’ म्हणजे घुसखोर, ज्यांनी म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांचा बेकायदा ताबा घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.