मुंबईत दिवसाला २० महिलाविरोधी अत्याचाराचे गुन्हे
प्रमाण कमी, मात्र घटनांमध्ये वाढ
मुंबई, ता. २४ ः लग्नानंतर वर्षाच्या आत डॉक्टर तरुणीने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने शहरातील वाढत्या महिलाविरोधी गुन्ह्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात दिवसाला सरासरी २० या वेगाने महिलाविरोधी गुन्हे नोंद होत आहेत. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत ५,२८४ गुन्हे नोंद झाले आहेत. गेल्यावर्षी ही संख्या ४,७८८ होती. त्यावरून यावर्षी सुमारे ५०० गुन्ह्यांची भर पडल्याचे स्पष्ट होते. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या तुलनात्मक आकडेवारीवरून हत्या, लैंगिक अत्याचार, हुंड्यासाठी छळ, अपहरण अशा सर्वच गुन्ह्यांचा आलेख या वर्षी वाढल्याचे दिसते.
या तुलनात्मक आकडेवारीनुसार शहरात महिलाविरोधी गुन्ह्यांमध्ये विनयभंगाची प्रकरणे सर्वाधिक नोंदवली जातात. गेल्या दीड वर्षात सुमारे ३,७०० विनयभंगाचे गुन्हे नोंद झाले आहेत. गेल्यावर्षी आणि या वर्षी विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या समान आहे. मात्र बलात्कार, अपहरण, हुंड्यासाठी छळ अशा गुन्ह्यांमध्ये मात्र मोठी वाढ झाल्याचे लक्षात येते.
या वर्षी प्रौढ महिला, अल्पवयीन तरुणी, बालिकांवर बलात्काराचे ९०७ गुन्हे नोंद झाले. गेल्यावर्षी ही संख्या ७७२ होती. अपहरणाचे या वर्षी १,०६५ तर गेल्या वर्षी ८९३, हुंड्यासाठी शारीरिक, मानसिक छळाचे ४०५ तर गेल्यावर्षी ३४५ गुन्हे नोंद झाले होते.
लोकसंख्येच्या तुलनेत देशभरातील अन्य महानगरांच्या तुलनेत मुंबईत महिलाविरोधी गुन्ह्यांचे प्रमाण कमी असले तरी गुन्ह्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे.
दरदिवशी सरासरी १३२ महिला बळी
एनसीआरबीच्या ताज्या अहवालानुसार २०२३मध्ये देशभरात ४.४८ लाख महिलांविरोधी गुन्हे घडले. त्यात ४.५९ लाख महिला बळीत ठरल्या. यातील ४७,१०१ गुन्हे अर्थात १०.५० टक्के गुन्हे महाराष्ट्रात घडले आहेत. त्यात ४५,८२७ महिला बळीत ठरल्या. २०२२च्या तुलनेत २०२३मध्ये १,७७० गुन्हे वाढल्याचे या अहवालात नमूद आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरदिवशी सरासरी १३२ महिला बळी ठरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.