गौरी पालवे आत्महत्याप्रकरणी
पती अनंत गर्जेला अटक
तीन दिवसांची पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याला वरळी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यास २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
केईएम रुग्णालयात दंत चिकित्सक असलेल्या डॉ. गौरी यांनी शनिवारी वरळी येथील बीडीडी वसाहतीतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. याबाबत पालकांनी केलेल्या आरोपांच्या आधारे वरळी पोलिसांनी गर्जेविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर सोमवारी त्यास अटक केल्यांतर न्यायालयात हजर करण्यात आले. गर्जे याचे अन्य एका महिलेशी संबंध असल्याची कागदपत्रे गौरी यांच्या हाती लागली होती. त्यावरून पती-पत्नीत वाद सुरू होते. गौरी यांना मारहाण करण्यात आली, धमकावण्यात आले, असा आरोप या प्रकरणातील फिर्यादी अशोक पालवे (डॉ. गौरी यांचे वडील) यांनी केले होते. दरम्यान, गर्जे याच्यासह त्याच्या भावंडांवरही आरोप आहेत. तसेच काही नातेवाइकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अशोक यांनी जबाबात उल्लेख केलेली मूळ कागदपत्रे लातूर येथील रुग्णालयात आहेत. ती ताब्यात घेऊन अशोक यांच्या आरोपांची शहानिशा करावी लागेल. गर्जे याच्या भावंडांचा शोध सुरू असून, त्यांच्याकडे चौकशी करणे बाकी आहे. त्यामुळे गर्जेला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
---
प्रेमसंबंधांबाबत पूर्वकल्पना
पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर आणि फिर्यादीच्या जबाबात डॉ. गौरी यांना गर्जेने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट होत नाही. घटनेवेळी डॉ. गौरी घरी एकट्याच होत्या. त्यांनी घर आतून बंद केले होते. शिवाय अन्य महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधांबाबत आरोपीने लग्नापूर्वीच डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांना पूर्वकल्पना दिली होती, असा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲड. मंगेश देशमुख यांनी केला.
---
गर्जे याच्या दाव्याचीही शहानिशा
घटनेपूर्वी गौरीसोबत माझा वाद झाला होता. घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो. सागरी सेतूवरून कारने प्रवास करीत असताना गौरीशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला; मात्र तिने फोन घेतला नाही. संशयाची पाल चुकचुकल्याने मी घरी परतलो. या वेळी माझ्यासोबत वाहनचालकही होता. घर आतून बंद होते. बराच काळ दार ठोठावूनही प्रतिसाद मिळत नव्हता. घरमालकाला फोन करून दुसऱ्या चावीबद्दल विचारणाही केली; मात्र वेळ निघून जात असल्याने २९व्या मजल्यावरील रेफ्युज एरियातील जाळी उचकटून खिडकीवाटे ३०व्या मजल्यावरील घरात शिरलो. तेव्हा पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, असा दावा गर्जेने पोलिसांकडे केला. तो खरा की खोटा हे तपासले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.