महापरिनिर्वाण दिनासाठी पालिका सज्ज
अनुयायांसाठी निवारा, प्रसाधनगृहे, सुरक्षा, आरोग्य सेवा आदींची चोख व्यवस्था
मुंबई, ता. ३ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी महापालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ यांसह आवश्यक विविध ठिकाणी नागरी सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
अनुयायांसाठी जलप्रतिबंधक निवासी मंडप, धूळ प्रतिबंधक आच्छादन, प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी, सुरक्षा व आरोग्यविषयक सेवासुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यासाठी आठ हजारांहून अधिक कामगार, कर्मचारी, अधिकारी कर्तव्यतत्पर असणार आहेत. चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यांवर व महापालिकेच्या विविध समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
अनुयायांसाठी चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान व अन्य ठिकाणी आवश्यक नागरी सेवासुविधांची पूर्तता करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार पूर्वतयारीबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या, की छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे एक लाख चौरस फूट क्षेत्रफळावर जलप्रतिबंधक (वॉटरप्रूफ) निवासी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. निवासी मंडपांत १० ठिकाणी एलईडी स्क्रीन लावल्या आहेत. ३० हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या पायवाटांवर धूळप्रतिबंधक आच्छादन केले आहे. तर, मैदानाभोवती एक हजार मीटर लांबीचे तात्पुरते कुंपण लावले आहे.
परिसरात स्वच्छतेसाठी ५२७ कामगार विविध संयंत्रांसह प्रत्येक सत्रात कार्यरत असतील. दर्शन रांग व मुख्य मार्गांवर एकूण १५० फिरती शौचालये, अभिवादन रांगेत १०, मैदान परिसरात २५४ शौचालये, महिलांसाठी पिंक टॉयलेट्सची तसेच नळ व शॉवर सुविधेसह २८४ तात्पुरत्या स्नानगृहांची व्यवस्था केली आहे. २० रुग्णवाहिका, डेंगी व हिवताप (मलेरिया)बाबत जनजागृतीसाठी कक्ष, आरोग्य तपासणी व औषधोपचार आदी वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे.
वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी ५८५ एवढ्या संख्येने तज्ज्ञ मनुष्यबळ कार्यरत असेल. गतवर्षी १३ हजार २८२ अनुयायांनी आरोग्य तपासणी व औषधोपचारांचा लाभ घेतला होता. कीटकनाशक व मक्षिका नियंत्रण फवारणीसाठीदेखील मनुष्यबळ नेमण्यात आले आहे, अशी माहिती जोशी यांनी दिली.
उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे म्हणाले, की सुरक्षेच्या अनुषंगाने, सीसीटीव्ही कॅमेरे, फिरते कॅमेरे व मेटल डिटेक्टर्स, बॅग स्कॅनर्स आदींसह नियंत्रण कक्ष, माहिती कक्ष व निरीक्षण मनोऱ्यांची उभारणी केली आहे. अग्निशमन वाहने, अतिदक्षता रुग्णवाहिका, दादर चौपाटी येथे बोट आदींची व्यवस्था केली आहे.
मोबाईल चार्जिंग सुविधा व संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २५४ नळांसह १६ टँकरची व्यवस्था असून अनुयायांसाठी बिस्किट व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उभारले आहेत, अशी माहितीदेखील सपकाळे यांनी दिली आहे.
अनुयायांनी या सेवासुविधांचा लाभ घ्यावा. तसेच, महापालिका व मुंबई पोलिस दल आदींकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
अशा आहेत सुविधा
- चैत्यभूमी येथे शामियाना व व्ही.आय.पी. कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था, नियंत्रण कक्षाशेजारी, तोरणा प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग तसेच अन्य ठिकाणी रुग्णवाहिकेसहीत आरोग्यसेवा.
- एक लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा
- पिण्याच्या पाण्याच्या नळाची, टँकरची व्यवस्था
- संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था
- अग्निशमन दलामार्फत आवश्यक विविध सेवा
- चौपाटीवर सुरक्षा रक्षकांसह बोटी
- चैत्यभूमी स्मारकातील आदरांजली कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यांवर तसेच समाज माध्यमांवर महानगरपालिकेच्या अधिकृत खात्यांद्वारे थेट प्रक्षेपण
- विचारप्रवर्तक पुस्तकांसह वैविध्यपूर्ण बाबींच्या विक्रीसाठी स्टॉल्स
- राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष
- स्काऊट गाईड हॉल येथे भिक्खू निवास
- मैदानात धूळ रोखण्यासाठी पायवाटेवर आच्छादन
- अनुयायांना मार्गदर्शनाकरिता १०० फूट उंचीवर स्थळ निदर्शक फुगे
- मोबाइल चार्जिंगकरिता छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे पॉइंट
- तात्पुरती स्नानगृहे व शौचालयांची सोय
- रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत व बसण्यासाठी बाकडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.