ई-चलान यंत्राद्वारे गरजू पालकांचा शोध
शाळाप्रवेशाचे प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक; पोलिस शिपायाचाही सहभाग
मुंबई, ता. ४ ः शहरातील नामांकित शाळेत पाल्याच्या प्रवेशासाठी धडपडणाऱ्या पालकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्याला वांद्रे-कुर्ला पोलिसांनी अलीकडेच बेड्या ठोकल्या. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपीने श्रीमंत पालकांची माहिती, तपशील मिळवण्यासाठी वापरलेली अनोखी पद्धतही उजेडात आली. ती पाहून पोलिसही चकित झाले.
राजेश कोटवानी या नावे पालकांशी संपर्क साधून १० ते २० लाखांच्या मोबदल्यात हमखास प्रवेशाची हमी देणारा प्रत्यक्षात महफूज झकी अहमद शेख हा सराईत आणि अभिलेखावरील (पोलिस रेकॉर्ड) भामटा असल्याचे स्पष्ट झाले. राजेश ऊर्फ महफूजला या गुन्ह्यात अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या पोलिस शिपाई अमोल अवघडे यालाही आरोपी करण्यात आले आहे. अवघडे या कारवाईपूर्वी वाहतूक पोलिसांच्या वांद्रे कक्षात नियुक्त होता.
महफूजने बीकेसीतील नीता अंबानी ज्युनियर स्कूलमध्ये आपल्या मुलाला प्रवेश मिळावा, यासाठी धावपळ करणाऱ्या दोन पालकांना गाठले. त्यांना स्वतःची ओळख या शाळेच्या प्रशासकीय विभागाशी संबंधित अधिकारी अशी करून दिली. त्याने या दोन्ही पालकांना स्वतःचे नाव राजेश कोटवानी असे सांगितले. व्यवस्थापन कोट्यातून हमखास प्रवेश मिळवण्यासाठी अनुक्रमे ९.३९ आणि १५ लाखांची मागणी केली. या व्यवहारासाठी त्याने बँक तपशीलही पालकांना पाठवले.
रक्कम लवकर अदा करावी, यासाठी तो पालकांवर दबाव आणत होता. पैसे उशिरा अदा झाले तर प्रवेशाची हमी घेणार नाही, सुवर्णसंधी हुकेल, असा निरोप त्याने पालकांना दिला होता. यातील एका मुलाच्या पालकांना संशय त्यांनी तडक शाळा गाठून राजेश कोटवानी नावाच्या व्यक्तीने दिलेली हमी आणि मागितलेल्या रक्कमेची माहिती दिली. तेव्हा प्रशासकीय विभागालाही धक्का बसला. विभागाने तातडीने याबाबतची तक्रार बीकेसी पोलिस ठाण्यात केली.
तक्रार प्राप्त होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून कोटवानी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीला अटक केली. आरोपी या ओळखीवर ठाम होता; मात्र त्याचा फोटो पोलिसांनी आपल्या अंतर्गत प्रणालीवर टाकताच त्याचे नाव महफूज शेख असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, शहरातील नामांकित शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत आर्थिक फसवणुकीचे चार गुन्हे त्याच्या नावे नोंद असल्याची माहितीदेखील प्राप्त झाली.
दरम्यान, धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळा, नीता अंबानी ज्युनियर स्कूल या दोन्ही संस्थांमध्ये कठोर आणि गुणवत्ताआधारित प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. ही प्रकरण लक्षात येताच संस्थेने तातडीने पोलिस तक्रार केली. सध्या त्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे, अशी प्रतिक्रिया या शैक्षणिक संस्थेच्या प्रवक्त्याने माध्यमांना दिली.
अशी करायचा फसवणूक
आधीच्या गुन्ह्यात शैक्षणिक संस्थांचे शिपाई, कर्मचारी किंवा अभ्यंगतांच्या नोंदणीसाठी वापरली जाणारी वही आदी स्रोतांमधून महफूज गरजू पालकांचे संपर्क क्रमांक, पत्ता आदी तपशील मिळवत होता. तो नीता अंबानी ज्युनियर स्कूलबाहेर उभा राहून आत येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा विशेषतः विद्यार्थी आणि त्याचे पालक उतरणाऱ्या महागड्या गाड्यांचा नोंदणी क्रमांकाचा मोबाईलद्वारे फोटो काढत असे. ते फोटो तो वाहतूक पोलिस शिपाई अवघडेला पाठवायचा. अवघडे संबंधित नोंदणी क्रमांकाआधारे स्वतःकडील ई-चलान यंत्राच्या मदतीने गाडी मालकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि फोटो आदी तपशील महफूजला पाठवायचा. त्याआधारे महफूज पालकांशी संपर्क साधून प्रवेशाचे प्रलोभन दाखवत असे.
हेतूबाबत आरोपी पोलिस अनभिज्ञ
महफूजने अवघडे यांना अनेक वाहनांचे फोटो पाठवून त्यांचे तपशील प्राप्त केले होते; मात्र या मदतीच्या मोबदल्यात अवघडे यांना आर्थिक लाभ झाला, याचे पुरावे अद्याप पोलिसांना मिळालेले नाहीत किंवा अवघडे यांनी ही गोपनीय माहिती विकली, अशी माहिती चौकशीतून पुढे आलेली नाही. उलट महफूजने या माहितीचे पुढे काय केले, ही बाब अवघडे यांना गुन्हा दाखल झाल्यावर समजली, असे तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
महफूजची पार्श्वभूमी
२०१७ मध्ये महफूजने नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून देतो, असे सांगत तब्बल ४० विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक केली होती. प्रत्येकाकडून त्याने पाच ते सहा लाख रुपये उकळले होते. या गुन्ह्यात त्याला शाळेच्या शिपायाने मदत केल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली होती.
२०१३ मध्ये चित्रपट अभिनेत्रीसह अन्य पालकांच्या फसवणूक प्रकरणात महफूजविरोधात गुन्हा नोंद झाला होता. गेल्यावर्षी ऑनलाइन प्रवेश घोटाळ्यात महफूजचा सहभाग उघड झाला होता.
महफूज सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे या दोन पालकांव्यतिरिक्त त्याने या किंवा शहरातील अन्य नामांकित शाळांमध्ये प्रवेशासाठी आतूर पालकांना अशाप्रकारे संपर्क साधून फसवल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
- सुरेश पाडवी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बीकेसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.