महापालिकेसाठी ‘आप’चे रणशिंग!
अनेक बडे नेते मुंबईत दाखल; सिद्धिविनायकाचे घेतले दर्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने (आप) आक्रमक पवित्रा घेतला असून, मुंबईत अधिकृतपणे प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि खासदार संजय सिंह यांच्यासह अनेक बडे नेते मुंबईत दाखल झाले असून, त्यांच्या उपस्थितीत मुंबई ‘आप’ने थेट मैदानात उतरून प्रस्थापितांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.
प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी (ता. २०) खासदार संजय सिंह आणि मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन यांनी पक्षाच्या सर्व उमेदवारांसह श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. ‘भाजप आणि शिवसेनेने मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवला आहे. हे भ्रष्टाचाराचे विघ्न दूर करण्यासाठी आम्ही विघ्नहर्त्याचा आशीर्वाद घेतला आहे,’ असे म्हणत संजय सिंह यांनी प्रचाराची दिशा स्पष्ट केली. मुंबई पालिका काबीज करण्यासाठी ‘आप’चे दिल्ली आणि पंजाबमधील पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि रणनीतिकार मुंबईत तळ ठोकून आहेत. हे नेते मुंबईतील प्रत्येक प्रभागात जाऊन ‘दिल्ली मॉडेल’ तसेच ‘भ्रष्टाचारमुक्त प्रशासन’ यावर भर देणार आहेत. या वेळी प्रीती शर्मा-मेनन यांनी सांगितले, की गेल्या ३० वर्षांपासून मुंबईकरांना नागरी समस्यांच्या गर्तेत ढकलणाऱ्या भाजप-सेनेच्या भ्रष्ट युतीतून मुंबईची सुटका करणे, हाच आमचा मुख्य अजेंडा आहे.