दारूचा एक थेंबही कर्करोगासाठी कारणीभूत
‘टाटा’ ॲक्ट्रेक विभागातील डॉक्टरांच्या अभ्यासातील निष्कर्ष
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : टाटा कर्क रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे, की अल्कोहोलच्या सेवनामुळे मुखाच्या कर्करोगाचा धोका दुप्पट होतो, विशेषतः गालाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेचा (बक्कल म्यूकोसाचा) कर्करोग होण्याची शक्यता जास्त बळविते. यामध्ये दारूचा एक थेंबही कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकतो, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा अभ्यास अलीकडेच आंतरराष्ट्रीय जर्नल बीएमजे ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झाला आहे.
खारघर येथील ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन करिअर्सने (एसीटीआरए) अल्कोहोलच्या सेवनाच्या जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी एक अभ्यास केला. कारण भारतात मुखाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग आहे. संशोधन लेखिका ग्रेस सारा जॉर्ज यांनी सांगितले, की अंदाजे १,८०३ कर्करोग रुग्ण आणि १,९०३ निरोगी व्यक्तींचा समावेश असलेला या गटाचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात बीअर आणि व्हिस्कीसारख्या ब्रँडेड मद्यांचे तसेच ग्रामीण आणि स्थानिक पातळीवर उत्पादित मद्यांचे, जसे की देशी मद्याचे परिणाम मूल्यांकन करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे अभ्यासात दररोज अल्कोहोलचे सेवन ग्रॅममध्ये मोजले गेले; ज्यामुळे प्रत्यक्षात अल्कोहोल सेवनाचा अचूक अंदाज घेता आला. कोणत्याही प्रकारच्या मद्यपानाने तोंडाच्या कर्करोगाचा धोका दुप्पट वाढतो, तर देशी दारूचे सेवन केल्याने हा धोका तीन ते पाच पट वाढतो. अभ्यासात असेही दिसून आले आहे, की दिवसातून एक वेळही मद्यपान धोकादायक आहे, म्हणजेच अल्कोहोलसाठी कोणतीही सुरक्षित मर्यादा नाही.
६२ टक्के कर्करोग तंबाखू व मद्यपानामुळे
अभ्यासातील वरिष्ठ प्रमुख लेखक डॉ. शरयू म्हात्रे यांनी सांगितले, की अल्कोहोल आणि तंबाखूच्या सेवनाचे एकत्रित परिणामदेखील या अभ्यासात तपासण्यात आले. दोन्ही एकत्रित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका पाच पटीने वाढला. अभ्यासानुसार, तोंडाच्या कर्करोगाच्या सुमारे १७ टक्के प्रकरणे केवळ अल्कोहोलमुळे, ३७ टक्के तंबाखूच्या सेवनामुळे आणि ६२ टक्के प्रकरणे अल्कोहोल आणि तंबाखूच्या एकत्रित सेवनामुळे होतात.
लोकांचा असा गैरसमज
सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजीचे संचालक डॉ. राजीव दीक्षित यांनी स्पष्ट केले, की लोकांचा असा गैरसमज आहे की थोडेसे मद्यपान करणे घातक नाही. अगदी कमी प्रमाणाचे मद्यपानदेखील कर्करोगाचा धोका वाढवते. या अभ्यासातून पहिल्यांदाच तंबाखूसोबत अल्कोहोल घेण्याचा धोका स्पष्टपणे दिसून आला आहे.
कर्करोगापलीकडे सामाजिक परिणाम
ॲक्ट्रेकचे संचालक, मुख आणि घशाच्या कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले, की दारू हे केवळ कर्करोगाचे प्रमुख कारण नाही तर घरगुती हिंसाचार, मद्यपान करून गाडी चालवणे, महिलांचा छळ, अपघात आणि हृदयरोगाचेदेखील एक प्रमुख कारण आहे. भारतातील तरुणांमध्ये मद्यपानाचे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे. भारतात तंबाखू, ड्रग्ज आणि पानमसाल्यांबाबत धोरणे आहेत, परंतु अल्कोहोल नियंत्रण धोरण नाही. अल्कोहोलचे ग्लॅमराइजेशन रोखणे आवश्यक आहे. सेलिब्रिटी आणि सरोगेट जाहिराती आवश्यक आहेत. मर्यादित प्रमाणात मद्यपान करणे ठीक आहे, असा सल्ला वैज्ञानिक पुराव्यांच्या विरुद्ध आहे.
भारतात सर्वाधिक प्रादुर्भाव
- भारतात दरवर्षी प्रति एक लाख पुरुषांमागे सरासरी १५ पेक्षा जास्त रुग्ण आढळतात.
- काही शहरांमध्ये हा दर ३० पर्यंत आहे.
- जगात भारतात तोंडाच्या कर्करोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.