मुंबई

नववर्षाच्या जल्लोषावर करडी नजर

CD

नववर्षाच्या जल्लोषावर करडी नजर
राज्यातील सीमांवर २८ तपासणी नाके; मुंबईत २३ विशेष पथके तैनात
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टी, क्लब कार्यक्रम आणि सामाजिक समारंभांची जोरदार तयारी सुरू असतानाच, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीशी संबंधित बेकायदेशीर प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाला आहे. त्याअंतर्गत राज्यभरात २८ सीमा तपासणी नाके उभारण्यात आले असून, मुंबई महापालिका क्षेत्रात भेसळयुक्त व अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी २३ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
३१ डिसेंबर व १ जानेवारीदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी परवाना व्यवस्था, तपासणी आणि गस्त अधिक कडक करण्यात आली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात येणाऱ्या पार्टी व कार्यक्रमांसाठी एकदिवसीय मद्यसेवन परवाना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहे. यानुसार एकदिवसीय मनोरंजन कार्यक्रमासाठी २७,९०० रुपये, तर सामाजिक समारंभ व सोशल गॅदरिंग पार्टीसाठी १४,००० रुपये मद्य परवाना शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
क्लब, हॉटेल आणि खासगी कार्यक्रम आयोजकांना कायदेशीर मार्गाने मद्यसेवनाची परवानगी मिळावी, तसेच बेकायदेशीर विक्रीला आळा बसावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ३१ डिसेंबर व नववर्षाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मद्यविक्री होत असल्याने मद्यतस्करी, भेसळयुक्त मद्य आणि हातभट्टीच्या विक्रीची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर राज्यभरात २८ सीमा तपासणी नाके उभारण्यात आले असून, बाहेरून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रगस्त घालत असून, संशयास्पद वाहनांची अचानक तपासणी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

-विक्रीसाठी वाढीव वेळेला परवानगी
उत्सवाच्या रात्री नागरिकांच्या सोयीसाठी वाइन शॉपला रात्री १ वाजेपर्यंत, तर परमिट रूमला पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन, अवैध विक्री किंवा ठरवून दिलेल्या वेळेपलीकडे व्यवसाय केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.

तक्रारींची तत्काळ दखल
मुंबई महापालिका क्षेत्रात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, भेसळयुक्त, हातभट्टी व बेकायदेशीर मद्यविक्री रोखण्यासाठी २३ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके संवेदनशील भागांत गस्त घालणार असून, तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कारवाई करणार आहेत. नववर्षाच्या जल्लोषात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि नागरिक सुरक्षितपणे उत्सव साजरा करू शकतील, यासाठी उत्पादन शुल्क विभाग पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे.


अवैध दारूविक्रीविरोधात कडक पावले
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे म्‍हणाले, ३१ डिसेंबर तसेच आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्रीविरोधात कडक पावले उचलली आहेत. परवाना नसताना मद्यविक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष पथके वाढविण्यात आली आहेत. आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांसाठी विभागामार्फत कायदेशीररीत्या मद्य परवाना घ्यावा. कोणत्याही ठिकाणी बनावट किंवा भेसळयुक्त मद्य आढळल्यास तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्‍यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic News : पुणेकरांनो सावधान! वाहतूक पोलिसांचा बडगा; ३ वर्षांत ४२ लाख वाहनचालकांवर कारवाईचा 'रेकॉर्ड'

Rajgad Illegal Hunting : राजगड तालुक्यात चौशिंग्या हरिण शिकार प्रकरणी वनविभागाकडून चार जणांना अटक; आरोपींकडून हत्यारे व मांस जप्त!

Latest Marathi News Live Update: दुर्मिळ चौशिंग्या हरिण शिकारप्रकरणी चार जणांना अटक

Pune News : ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांची बिनविरोध निवड; राज्य वकील परिषदेचे नेतृत्व पुन्हा पुण्याच्या हाती

Pune Election: पुण्यात निवडणुकीचा नवा पॅटर्न; 'हे' तीन पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार

SCROLL FOR NEXT