पाणी, वीज, शिक्षण, आरोग्याची गॅरंटी
आम आदमी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : प्रत्येक घराला दरमहा २० हजार लिटरपर्यंत मोफत पाणी, एक हजार ‘मोहल्ला क्लीनिक’, प्रति कुटुंब २०० युनिटपर्यंत मोफत वीज, मोफत मीटर, विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट पास, पर्यावरणाचे संरक्षण अशा अनेक सोयीसुविधांची गॅरंटी देणारा आम आदमी पक्षाचा जाहीरनामा मंगळवारी (ता. ३०) प्रसिद्ध करण्यात आला.
‘केजरीवालची गॅरंटी’ या संकल्पनेखाली तर दिल्ली आणि पंजाबमधील ‘आप’ सरकारच्या यशस्वी प्रशासकीय मॉडेलवर हा जाहीरनामा आधारित आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला. शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी किमान १० हजार इलेक्ट्रिक बसचा ताफा उभारून ‘बेस्ट’चे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. ‘झीरो पॉटहोल’ धोरणांतर्गत खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘बेस्ट’च्या डेपोचे व्यापारीकरण थांबवण्याचा निर्धारही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आला आहे. कचरा व्यवस्थापनासाठी वर्गीकरणावर भर देत जनजागृती, प्रोत्साहन आणि दंड अशी त्रिसूत्री राबवली जाणार आहे. अल्प उत्पन्न गटातील गर्भवती महिलांना बाळ एक वर्षाचे होईपर्यंत दरमहा पाच हजार रुपयांची थेट आर्थिक मदत देण्यात येणार आहे. महिला आणि १२ वर्षांखालील मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे. शाळांमध्ये समुपदेशकांची नियुक्ती करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. मोकळ्या जागा, कांदळवन आणि मिठागरांचे संरक्षण, आरे कॉलनीला राखीव वन घोषित करण्याची मागणी, तसेच हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी कडक नियम लागू करण्याचा प्रस्ताव जाहीरनाम्यात आहे.
७५ हजार कोटी रुपयांहून अधिकचा अर्थसंकल्प असूनही महापालिकेने मुंबईकरांना दर्जेदार सेवा दिलेल्या नाहीत. भ्रष्टाचार, निकृष्ट कामे आणि जबाबदारीचा अभाव, यामुळे शहराची ओळख मलिन झाली आहे. हा जाहीरनामा म्हणजे केवळ पर्याय नाही, तर मुंबईला पुन्हा सक्षम आणि सन्मानाचे स्थान मिळवून देण्याची ठोस योजना आहे.
- प्रीती शर्मा-मेनन, मुंबई अध्यक्षा, आप