ठग, सायबर भामटे, ड्रग्ज तस्करांना वेसण घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान
गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने उपाययोजना करण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः नव्या वर्षात सायबर भामटे, ठग आणि अमली पदार्थ तस्करांच्या संघटित टोळ्यांना वेसण घालण्याचे तगडे आव्हान मुंबई पोलिसांसमोर असेल.
सरत्या वर्षात सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक आणि अमली पदार्थांची शहरात वाढलेली रेलचेल पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली होती. या गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता नव्या वर्षात पोलिसांना विशेष उपाययोजना कराव्या लागतील.
आर्थिक फसवणूक पाच पटीने वाढली
गेल्या वर्षात आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांनी कळस गाठला. २०२४ मध्ये (जानेवारी ते नोव्हेंबर) आर्थिक गुन्हे शाखेने ६९ गुन्हे नोंदवले. त्यात फसवणुकीची रक्कम साडेतीन हजार कोटींच्या घरात होती. २०२५ मध्ये नोंद गुन्ह्यांची संख्या १०८ वर गेलीच; पण त्यातील फसवणुकीची रक्कम २०२४च्या तुलनेत पाच पटीने वाढली. २०२५ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने तपासावर घेतलेल्या गुन्ह्यांमध्ये फसवणुकीची रक्कम १६,५०० कोटींच्या घरात पोहोचली. बँका, खासगी वित्त संस्थांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेत ते बुडवणे, मिठी गाळ उपसा कंत्राटाप्रमाणे काम न करता कोट्यवधींचे बिल उकळणे ही गुन्हे आहेतच; मात्र त्यात स्वस्तात घर मिळवून देतो, कंत्राट मिळवून देतो, असे सांगत सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक, व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ठगांचा उपद्रव वाढल्याचे ही आकडेवारी दर्शविते.
सायबर गुन्हेगारी
२०२४च्या तुलनेत २०२५ मध्ये सायबर गुन्ह्यांची संख्या कमी असली तरी त्यातील फसवणुकीची रक्कम मात्र कैक पटीने वाढली. गेल्या वर्षी ४,७६५ सायबर गुन्हे नोंद झाले. यावर्षी ४,२२२ गुन्हे (दोन्ही वर्षांची आकडेवारी नोव्हेंबरपर्यंत) नोंद झाले. या वर्षी गुन्ह्यांची संख्या कमी भरली तरी बोगस शेअर ट्रेडिंग ॲप, आभासी अटकेद्वारे सायबर भामट्यांनी अनेक व्यक्तींकडून कोट्यवधी रुपये उकळले. ऑक्टोबर महिन्यात शहरातील ७२ वर्षीय वृद्धास आभासी अटकेत ठेवत भामट्यांनी तब्बल ५८ कोटी रुपये उकळले. देशातील आभासी अटकेच्या प्रकरणातील आजवरची ही सर्वात मोठी फसवणूक ठरली. त्या आधी मुंबईत २० तर दिल्लीत २३ कोटींची फसवणूक नोंद होती.
ड्रग्ज प्रवाह
एमडीसारख्या घातक, रासायनिक अमली पदार्थांचे कानाकोपऱ्यात सुरू झालेले उत्पादन आणि परदेशी गंजासह (हायड्रोपोनिक वीड), कोकेन, हेरॉईन आदींची सहज, मोठ्या प्रमाणात होणारी तस्करी रोखणे मुंबई पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणांसाठी आव्हान ठरते आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये सेवन करणाऱ्यांची संख्या वाढल्याने अमली पदार्थांची मागणी वाढते आहे. झटपट पैसे असल्याने एमडी उत्पादन, विक्रीतील सहभाग वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर या वर्षी एकट्या मुंबई पोलिसांनी सुमारे आठ हजार कोटींचे १,६०० किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. अमली पदार्थ उत्पादन, तस्करी, विक्री थोपविण्यासाठी या वर्षी राज्य सरकारने मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव मंजूर केला. त्यासोबत प्रतिबंधात्मक ताबा घेत राज्यातील अन्य शहरांतील कारागृहात आरोपींना किमान एक वर्ष कोठडीत ठेवण्याची तरतूदही पोलिसांनी अमलात आणली आहे. नव्या वर्षांत कठोर कारवाईसह पोलिसांना आक्रमक जनजागृतीवर भर देत अमली पदार्थांच्या मगरमिठीतून मुंबईची सुटका करावी लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.