ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय
भांडुप बस अपघातातील चालकास अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः भांडुप येथील बेस्ट बस अपघातास जबाबदार धरत बेस्टचालक संतोष सावंत (वय ५२) यांना मंगळवारी पहाटे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय पडल्याने बस अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याचे सावंत यांनी पोलिसांना जबाब दिला आहे.
सावंत हे २००८ पासून बेस्ट उपक्रमात चालक म्हणून कार्यरत आहेत. दोन ते तीन महिन्यांपासून ते इलेक्ट्रिक बस चालवत असून, सोमवारी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच म्हणजे रात्री ९.३०च्या सुमारास कर्तव्यावर दाखल झाले. बस आगारातून बसथांब्यावर नेताना ब्रेकऐवजी पाय एक्सलेटरवर पडल्याने बस अनियंत्रित होऊन, थांब्यावर रांगेत उभ्या प्रवाशांना बस धडकली, अशी माहिती त्यांनी जबाबात दिली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रण, प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाद्वारे सावंत यांनी केलेल्या दाव्यांची पोलिस खातरजमा करणार आहेत. दरम्यान, घटनेवेळी सावंत दारूच्या नशेत नसल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाल्याची माहिती परिमंडळ सातचे उपायुक्त हेमराज राजपूत यांनी दिली.
--
मृतांची ओळख पटली
बेस्ट अपघातात तीन महिलांसह चौघांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले होते. प्रणिता संदीप रसम (वय ३५), वर्षा सावंत (२५), मानसी गुरव (४९) आणि प्रशांत शिंदे (३०) अशी मृतांची नावे आहेत. प्रणिता, वर्षा आणि मानसी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या, तर प्रशांत वाहतूक वॉर्डन म्हणून काम करीत होते.
----
अपघातानंतर फेरीवाले हटवले
चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर पालिका आणि बेस्ट प्रशासनाला जाग आली. दररोज या मार्गावर दोनशेहून अधिक फेरीवाले रहदारीस अडथळा निर्माण करतात. आज मात्र प्रशासनाच्या कारवाईमुळे एकही फेरीवाला दिसला नाही. त्यामुळे वाहने आणि पादचारी मोकळेपणाने ये-जा करीत होते. पालिकेचे अतिक्रमणविरोधी वाहनही याठिकाणी तैनात होते. तसेच बेस्टचे कर्मचारीही आगारातून सुटणाऱ्या बसला दिशादर्शन करीत होते. ही व्यवस्था नियमित असती, तर हा अपघात घडलाच नसता, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
---
शेलार यांनी घेतली जखमींची भेट
भांडुप बस अपघातात जखमी झालेल्यांची मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुलुंड येथील एम. टी. अगरवाल रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची विचारपूस केली. तसेच जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.