काँग्रेस, भाजप आणि सेना-मनसेची कसोटी
प्रभाग क्रमांक १०२मध्ये मुस्लिमांची मते निर्णायक
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : वांद्रे पश्चिम मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १०२ मध्ये भाजप, काँग्रेस आणि सेना-मनसेमध्ये तुल्यबल लढत पाहायला मिळणार आहे. हा मतदारसंघ मुस्लिमबहुल असल्याने येथे मुस्लिमबांधवांच्या मतांचे वर्चस्व सर्वाधिक असणार आहे. २०१७ मध्ये सेना-भाजपच्या वादात अपक्ष उमेदवाराचा विजय झाला होता. आता युती आणि आघाडीची समीकरणे बदलल्याने सर्व पक्षांची कसोटी लागणार आहे.
या मतदारसंघात २०१७ मध्ये शिवसेना-भाजपमध्ये लढत रंगली असताना दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, असे होऊन अपक्ष उमेदवार मुमताज खान यांचा विजय झाला होता.
मुमताज खान यांनी काँग्रेसच्या कविता रॉड्रिक्सचा अवघ्या ३८७ मतांनी पराभव केला होता. आता हा प्रभाग खुला प्रवर्गात आला असून या वेळी भाजपकडून या प्रभागासाठी नीलेश हंडगर, शिवसेना-मनसे युतीकडून आनंद हजारे, काँग्रेसच्या वतीने रेहबर-खान राजा, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) झाईद खान, तर अपक्ष अमोल पवारसह अन्य अपक्ष असे या प्रभागातील मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत.
रामदास नायक रोड, डी.आर. वरस्कर रोड, सँट पीटर रोड, चॅपल रोड, के.सी. रोड, संतोषनगर, वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे बस डेपो, ओ.एन.जी.सी. कॉलनी या मुख्य ठिकाणांचा या प्रभागात समावेश आहे. या प्रभागात विशेषतः मुस्लिमबांधव मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा मतांचा टक्का निर्णायक ठरणार आहे. यासोबतच मराठी, ख्रिश्चन, गुजराती, जैन यांचाही इथे समावेश असून त्यांची मते कोणाला मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विशेषत: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या सेना-मनसेला मराठी मते आपल्याकडे वळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
प्रमुख समस्या
वाहतूक कोंडी ही या प्रभागातील मुख्य समस्या आहे. अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट आहेच. यातील काही भाग हा गावठण (जुनी, ब्रिटीशकालीन घरे आहेत) त्यामुळे येथील पुनर्विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. येथील झोपडपट्ट्यांचे पुनवर्सन हाही गहन विषय असून वर्षानुवर्षे रखडलेला आहे.
लोकसभा, विधानसभेतील चित्र
लोकसभेत महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांचा अटीतटीच्या शर्यतीत पराभव केला होता. तर विधानसभेत भाजपचे आशीष शेलार यांनी काँग्रेसच्या आसिफ झकेरियांच्या पराभव करून विजयाची हॅट्ट्रीक साधली होती.
२०१७चा निकाल
- मुमजात रेहबर खान (अपक्ष) ६,६१७ मते- विजयी
- कविता रॉड्रिक्स (काँग्रेस), ६,२३० मते
- फमिदा डिसिव्हा (अपक्ष) ४,३०४ मते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.