वांद्र्यात मनसेच्या ११ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
आमदार आशीष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षातील बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यातच मुंबईत ठाकरे बंधूंना मोठा राजकीय धक्का बसला आहे. वांद्रे विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडले असून येथील प्रभाग क्रमांक ९७ आणि ९८ मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ११ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.
मनसेचे सांताक्रूझ येथील उपविभाग अध्यक्ष विजय काते, शाखा अध्यक्ष जितेंद्र गावडे, शाखा सचिव भाऊराव विश्वासराव, उपशाखा अध्यक्ष विजय कुलकर्णी, ॲड. अशोक शुक्ला, नरेंद्र कौंडीपूजला, प्रवीण पाटील, रोहित गोडीया, अजय कताळे, दत्ताप्रसाद देसाई, मनविसे उपविभाग अध्यक्ष आकाश आवळेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार आशीष शेलार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. २) हा पक्षप्रवेश पार पडला. वांद्रे हा परिसर राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो; मात्र निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी घेतलेली ही टोकाची भूमिका ठाकरे बंधूंच्या विजयाच्या समीकरणात अडथळा ठरू शकते. जागावाटपात या दोन प्रभागांमधील एक जागा ठाकरेंच्या गटाकडे गेल्याने आणि दुसरी जागा निष्ठावंत उमेदवाराला न मिळाल्याची भावना या पदाधिकाऱ्यांमध्ये होती. पक्ष स्थापनेपासून एकनिष्ठ असलेल्यांना बाजूला सारून बाहेरील उमेदवार लादल्याचा आरोप या ११ पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देताना केला.
अपक्ष उमेदवारांकडून अर्ज मागे
वांद्रे मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १०१ आणि १०२ मधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या पवार दाम्पत्याने आमदार आशीष शेलार यांच्या मध्यस्थीनंतर आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी मागे घेतला. अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असताना अपक्ष उमेदवाराची मनधरणी करण्यात याठिकाणी भाजपला यश आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.