आग लागलेल्या इमारतीतून
२७ जणांची सुखरूप सुटका
अंधेरीतील दुर्घटना; चार जण रुग्णालयात दाखल
सकाळ वृत्तासेवा
मुंबई, ता. ३ : अंधेरी पश्चिमेतील एस. व्ही. रोडवर असलेल्या ‘चांदीवाला पर्ल रिजन्सी’ या १८ मजली निवासी इमारतीला शनिवारी (ता. ३) दुपारी भीषण आग लागली. आगीमुळे इमारतीत सर्वत्र धूर पसरल्याने अडकून पडलेल्या २७ रहिवाशांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. या दुर्घटनेत धुराचा त्रास झालेल्या आणि किरकोळ भाजलेल्या तीन अग्निशमन जवान आणि एका महिला रहिवाशाला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, एस. व्ही. रोडवरील अंधेरी सबवे समोर असलेल्या या इमारतीला दुपारी साधारण २.१० वाजता आग लागल्याचा कॉल प्राप्त झाला. अग्निशमन दलाने तत्परतेने दखल घेऊन दुपारी २:३७ वाजता ही ‘स्तर-१’ची आग असल्याचे घोषित केले. बचावकार्यादरम्यान उदय गिझे (वय ४५), आकाश कसले (वय ३१), अमोल कानोलकर (वय ४१) हे अग्निशमन जवान किरकाेळ भाजले, तर रहिवासी समरीन शेख (वय २७) या धुरामुळे गुदरल्याने त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील जिममध्ये लागली होती. इलेक्ट्रिक डक्टमधून ती चौथ्या मजल्यापर्यंत पसरली. यामुळे पहिल्या ते चौथ्या मजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग, फॉल्स सीलिंग आणि जिममधील साहित्याने पेट घेतला. त्यामुळे इमारतीत मोठ्या प्रमाणावर काळा धूर साचल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून नऊ जणांना, तर शिडीच्या सहाय्याने अन्य १८ जणांना सुखरूप बाहेर काढले.
------
अडीच तासांनी आगीवर नियंत्रण
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे आठ बंब, चार जम्बो टँकर, दाेन टीटीएल आणि इतर विशेष वाहने घटनास्थळी तैनात होती. अग्निशमन दलासोबतच पोलिस, बेस्टचे कर्मचारी आणि पालिका वॉर्ड कर्मचारी यांनी समन्वयाने काम केले. जवळपास अडीच तासांनी दुपारी ४.३५ वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.