भाजपचे हिंदुत्व हे केवळ ढोंग
उद्धव ठाकरे यांचा प्रहार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : भाजपचे हिंदुत्व आणि देशप्रेम हे केवळ ढोंग आहे. या ढोंगावर लाथ मारायची शिकवण मला प्रबोधनकार आणि शिवसेनाप्रमुखांकडून मिळाली आहे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला. राज ठाकरे यांच्यासोबत येण्यामागची भूमिका स्पष्ट करतानाच आम्ही वादाची माती गाडून मराठी माणसासाठी एकत्र आलो आहोत, असे जाहीर केले.
ठाकरे म्हणाले, ‘‘आमच्या सत्ताकाळात पालिकेच्या तिजोरीत ९२ हजार कोटींच्या ठेवी होत्या. भाजपने त्या ७० हजार कोटींवर आणल्या आहेत. तीन लाख कोटींचा घोटाळा करून मुंबईचे ‘अदाणीकरण’ सुरू आहे. मुंबईचे पुन्हा ‘बॉम्बे’ करण्याचा डाव आहे. मुंबई गिळण्यासाठीच त्यांना शिवसेना संपवायची आहे. तुम्ही काय आम्हाला संपवणार, तुम्ही तर मोदींचे बँडवाले आहात; ब्रँड तर आमचा ठाकरे आहे. ठाकरे आणि पवार ही दोन नावे पुसली की मराठी माणूस अनाथ होईल, असे भाजपला वाटते; पण समोर बसलेला जनसमुदाय हेच ठाकरेंचे अस्तित्व आहे.’’
मातृभाषेचे प्रेम रक्तात हवे
मातृभाषेचे प्रेम हे रक्तात असावे लागते. आमच्या डोळ्यांदेखत घराचे, शहराचे, राज्याचे लचके तोडले जात असतील तर आम्ही ठाकरे म्हणून गप्प बसणार का? आम्ही आमच्यातले वाद गाडून टाकले आणि मराठी माणसासाठी ताकद म्हणून उभे राहिलो आहोत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी जनसंघ कुठेच नव्हता. मराठी माणसावर गोळ्या झाडणारे मोरारजी देसाई हे हिंदूच होते आणि मरणारी मराठी माणसं होती. त्यांचे हे कसले हिंदुत्व? हे लोक घरं पेटवून पोळ्या भाजणारे आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
---
शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही!
मुंबई तोडण्याचा डाव सुरू असल्याचे आम्ही पोटतिडकीने सांगतोय. ते सांगितल्यानंतर तुमच्या पोटाला तळ लागून उपयोग नाही. डोक्यात तिडीक जाणार नसेल तर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, असेही ठाकरे यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.