मनसेच्या जागांत एक जागेची घट
अवघे सहा उमेदवार विजयी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शिवसेना ठाकरेंसोबत युती होती. शिवसेनेला ६७ जागा मिळाल्या, तर मनसेने मुंबईतील सहा प्रभागांत विजय मिळवला. यात महिला उमेदवारांचे वर्चस्व दिसून येते. सहापैकी पाच महिला विजयी झाल्या आहेत.
महापालिका निवडणुकीत मनसेने मुंबईत ५२ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांना पराभवाचा धक्का बसला. ठाकरे बंधूंसोबत राष्ट्रवादी (शरद पवार गट) आघाडीने लढली होती; मात्र उपनगरांत मनसेने चांगली लढत दिली. शिवसेनेलाही (ठाकरे गट) पराभवाचा फटका बसला. या तिन्ही पक्षांच्या समन्वयाचा फायदा काही जागांवर झाला. मनसेच्या विजयी उमेदवारांत प्रभाग क्र. ३८ मधील सुरेखा परब, प्रभाग ७४ मधील विद्या आर्या, प्रभाग १२८ मधील सई शिर्के, प्रभाग २०५ मधील सुप्रिया दळवी, प्रभाग ११५ मधील ज्योती राजभोज आणि प्रभाग ११० मधील हरीनाक्षी मोहन चिराथ यांचा समावेश आहे. या महिला उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधून विजय खेचून आणला. दुसरीकडे मुलुंडच्या वॉर्ड क्र. १०६ मध्ये भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी विजय मिळवला.
==