मुंबईत दलित पक्षांची कामगिरी ठरली निष्प्रभ
एकाही पक्षाला मुंबईत आपले खाते खोलता आले नाही
मुंबई, ता. १७ : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोठ्या राजकीय पक्षांनी चांगली कामगिरी केली असली तरी मुंबई व उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वतःची वोट बँक असलेल्या दलित आणि आंबेडकरवादी राजकीय पक्षांना कोणतीही प्रभावी कामगिरी बजावता आली नाही. २२७ पैकी ९५ प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव होते. त्यात महिलांसाठी आठ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. परंतु दलित आणि आंबेडकरी विचार घेऊन कार्यरत असलेल्या एकाही राजकीय पक्षाला या राखीव प्रभागांमध्ये आपला उमेदवार निवडून आणता आला नाही. दुसरीकडे यांच्या मतांचा लाभ मात्र इतर राजकीय पक्षांना झाला.
काँग्रेससोबत मुंबईत वंचितने आघाडी केली. त्यामध्ये ५० जागांवर वंचितने आपले उमेदवार उभे केले होते. त्यात वंचितला यश मिळाले नाही. उलट काँग्रेसच्या २४ जागा निवडून आल्या. तब्बल चार प्रभागांमध्ये वंचितने शिवसेना, भाजप आणि इतर पक्षांच्या उमेदवारांशी मोठी लढत देत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान गाठले, असे वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.
अनेक प्रभागांमध्ये ‘नोटा’इतकी मतेदेखील दलित राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मिळू शकली नाहीत. पुढील काळात तरी किमान दलित आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या राजकीय पक्षांनी आपापले प्रभाग बांधून यावर काम केले तर त्यांना यश मिळू शकते, असे राजकीय तज्ज्ञांना वाटते.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने आपले २४हून अधिक उमेदवार उभे केले होते. या पक्षालाही नजरेत भरेल, असे यश अथवा मते मिळू शकली नाहीत. दुसरीकडे मान्यवर कांशीरामजी यांचा वारसा सांगत राज्यात प्रत्येक वेळी एकला चलोचा नारा देणाऱ्या बहुजन समाज पक्षालादेखील मुंबईमध्ये कुठेही यश मिळाले नाही. एकेकाळी मोठी वोट बँक असलेले अनेक मतदारसंघ बहुजन समाज पक्षाची वेळोवेळी बदलणाऱ्या भूमिकेला कंटाळल्याने त्यांनी याकडे पाठ फिरवली. यामुळे मुंबईत बसपाच्या उमेदवारांना दलित मताचा फार लाभ मिळू शकला नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असलेल्या आनंदराज आंबेडकर यांनी सत्तेतील शिवसेनेसोबत मुंबईत युती केली होती. या युतीमध्ये रिपब्लिकन सेनेला एकूण पाच ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती. त्यामध्ये धनुष्यबाण या चिन्हावरच या उमेदवारांनी ही निवडणूक लढली. यात प्रभाग क्रमांक ११८मध्ये तेजस्वी गाडे या उमेदवाराने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला अटीतटीची लढत दिली असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी दिली.
--
निराशाजनक कामगिरी
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर मुंबईमध्ये सर्वच दलित आणि आंबेडकरवादी राजकीय पक्षांची निराशाजनक कामगिरी समोर आली. राज्यातील सत्तेत सहभाग असलेले रिपाइं नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंची या निवडणुकीत खूपच नाचक्की झाली. शिवसेना आणि भाजपने त्यांना मुंबईत एकही जागा सोडली नाही. त्यामुळे नाइलाज म्हणून काही कार्यकर्त्यांनी १४ ठिकाणी पक्षाचे आदेश आणि युतीतील स्थान डावलून आपापल्या स्तरावर निवडणुका लढवल्या; मात्र त्यांना फार यश येऊ शकले नाही.
------------
दलित मतदार विविध पक्षात विखुरले
दलित समाजाची मुंबईत मोठी ताकद आहे; मात्र दलित व्होट बॅंक विविध पक्षात विभागली गेल्याने त्याचा सकारात्मक परिणाम कुठेच दिसला नाही. निवडणुकीत दलित मतदार कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्यात विभागला गेल्याचे दिसून आले. दलित मतांची झालेली विभागणी यामुळे या गटांचा एकही उमेदवार निवडून येवू शकला नाही.
निवडणुकीचे तंत्र आणि लागणारी यंत्रणा दलित समाजात काम करणाऱ्या कोणत्याही पक्षाला उभी करता आलेली नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी आता नव्या नेतृत्वाशिवाय पर्याय नसल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे यांनी मांडले आहे.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.