शिवसेनेचे नगरसेवक हॉटेलमध्ये
दगाफटका टाळण्यासाठी शिंदेंची खबरदारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये ठेवले आहे. शिवसेनेच्या मदतीशिवाय मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येऊ शकत नाही. त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये, म्हणून शिवसेनेने खबरदारी घेतली आहे.
मुंबईत सत्तास्थापनेसाठी ११४ नगरसेवकांची गरज आहे. भाजपने ८९ जागा, तर शिवसेनेने २९ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा एकत्रित आकडा ७२ वर जातो. काँग्रेसला २४ जागांवर यश मिळाले आहे. अशावेळी काँग्रेससह इतर पक्ष त्यांच्यासोबत आल्यास त्यांचा एकत्रित आकडा बहुमताच्या निकट पोहोचतो. ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला, तर शिवसेना शिंदे गटाला धोका निर्माण होऊ शकतो. निवडून आलेले बहुतेक नगरसेवक आधी ठाकरेंकडेच होते. अशा परिस्थितीत ठाकरे गटाकडून राजकीय हालचाली झाल्यास परिस्थिती बदलू शकते. ही बाब लक्षात घेता शिवसेना शिंदे गटाने सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवले आहे.
==
...तर सत्तेचे समीकरण बदलणार!
मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे २९ उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीने बहुमताचा आकडा ओलांडला तरी, एकनाथ शिंदे पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. महापालिकेत सत्तास्थापनेचा दावा केला जात नाही, तोपर्यंत नगरसेवकांची फाटाफूट होऊ नये म्हणून सर्वांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधक किंवा अन्य पक्षांकडून नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती शिवसेनेला आहे. तसे झाल्यास सत्तेचे समीकरण बिघडू शकते.
==
महापौरपद सोडू नये!
मुंबईत सत्ता स्थापनेसाठी ११४ नगरसेवकांचा पाठिंबा गरजेचा आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपला बहुमताचा आकडा गाठता येत नाही. त्यामुळे शिवसेना शिंदे यांनी राजकीय डावपेच आखत महापौरपद सोडू नये, अशी भूमिका काही नगरसेवकांनी घेतली आहे.
==
शिवसेना शिंदे गटाचे दोन तृतीयांश नगरसेवक फुटल्यास सत्ता बदल होईल. अखंड शिवसेना फुटली ते सर्वकाही पैशाच्या जोरावर. त्याचा सूड उद्धव ठाकरे घेऊ शकतात, अशी भीती असू शकते.
- जयंत माईनकर, ज्येष्ठ पत्रकार
==
मुंबई महापालिकेत निवडून आलेले नगरसेवक फुटू नयेत, यासाठी शिवसेना शिंदे यांनी खबरदारी घेतली असेल; परंतु राज्यात सरकार असल्याने नगरसेवक फुटण्याची शक्यता कमी आहे.
- प्रताप आजबे , ज्येष्ठ पत्रकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.