पालिकेच्या शैक्षणिक इतिहासात नवा टप्पा
सीबीएसईच्या पहिल्या १०वीच्या बॅचसाठी विशेष नियोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : महापालिकेच्या शैक्षणिक प्रवासात यंदाचे वर्ष विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. सीबीएसई मंडळाशी संलग्न असलेल्या पालिकेच्या १८ शाळांपैकी १० शाळांमधील पहिलीच तुकडी यंदा दहावीच्या परीक्षेला सामोरे जात आहे. एकूण ३६६ विद्यार्थी या ऐतिहासिक परीक्षेत सहभागी होत असून, पालिकेच्या शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता आणि क्षमता अधोरेखित होणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा १७ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत होणार आहेत. ही पालिकेची पहिलीच सीबीएसई दहावीची बॅच असल्याने शिक्षण विभागाने विशेष दक्षता घेत व्यापक नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना परीक्षेची सवय लावणे, या उद्देशाने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र, इंग्रजी आणि आयसीटी या विषयांवर केंद्रित विशेष मार्गदर्शन दिले जात आहे.
पालिकेतील अनुभवी शिक्षकांसोबतच नामांकित खासगी सीबीएसई शाळांतील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत आहे. उत्तरपत्रिका कशी मांडावी, प्रश्नांना नेमके आणि परिणामकारक उत्तर कसे द्यावे, यासाठी ऑनलाइन मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सराव प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी अधिक भक्कम केली जात आहे.
या विशेष प्रयत्नांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनाही आता जागतिक दर्जाच्या शिक्षण मंडळांतर्गत परीक्षा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पालिकेचा हा उपक्रम केवळ एक परीक्षा नसून, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
आठ भाषांमध्ये शिक्षण
महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचा शिक्षण विभाग सध्या आठ भाषांमध्ये आणि एसएससी, सीबीएसई, आयसीएसई व बीई अशा चार शिक्षण मंडळांअंतर्गत शिक्षण देत आहे. पालिकेच्या एसएससी बोर्डाचा निकाल यापूर्वीच ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, सीबीएसई परीक्षेतही उत्तम यश मिळेल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.