स्थलांतरित पक्ष्यांबाबत मार्गदर्शन
नांदूर-मधमेश्वरमध्ये बीएनएचएसचा पक्षीशास्त्र अभ्यासक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : महाराष्ट्रातील रामसर स्थळावर असलेल्या नांदूर-मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे (बीएनएचएस) तीन दिवसांचा पक्षीशास्त्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पार पडला. १६ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित या अभ्यासक्रमात राज्यातील सुमारे १५ पक्षीनिरीक्षक, विद्यार्थी, निसर्गप्रेमी व अभ्यासकांनी सहभाग घेतला. हिवाळी स्थलांतरित पक्षी, पक्षी मोजणीच्या शास्त्रीय पद्धती, स्थलांतर अभ्यास आणि पक्षी रिंगिंग याबाबत या वेळी सखोल प्रशिक्षण देण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील निफाडजवळ वसलेल्या या रामसर स्थळावर प्रत्यक्ष क्षेत्रकार्याचा अनुभव घेण्याची संधी सहभागींना मिळाली.
अभ्यासक्रमाचे उद्घाटन नांदूर-मधमेश्वर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रीय वनाधिकारी हिरालाल चौधरी यांच्या हस्ते झाले. त्यांनी अभयारण्याचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करत हिवाळ्यात येथे विविध स्थलांतरित पक्ष्यांची मोठी संख्या आढळते, असे नमूद केले. वर्गीय सत्रांसोबतच क्षेत्रभेटींच्या माध्यमातून पक्षी मोजणी, आशियाई जलपक्षी गणना (एशियन वॉटरबर्ड सेन्सस), तसेच पक्षी रिंगिंगचे प्रात्यक्षिक झाले. कार्यक्रमादरम्यान ११ पक्ष्यांचे रिंगिंग करण्यात आले; त्यात युरेशियन राइननेक या पक्ष्याचाही समावेश होता.
महाराष्ट्रातील पक्षीनिरीक्षकांकडून या अभ्यासक्रमाला मोठी मागणी होती. त्यामुळेच नांदूर-मधमेश्वरसारख्या प्रसिद्ध रामसर स्थळाची निवड करण्यात आली, असे किशोर रिठे यांनी सांगितले. अभ्यासक्रमाबाबत सहभागी समाधानी असून, पुढील प्रगत अभ्यासक्रमांत सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. निसर्गसंवर्धनाची वैज्ञानिक समज वाढविणारे व्यासपीठ म्हणून हा अभ्यासक्रम प्रभावी ठरला, असे सहभागींचे मत आहे.
पक्ष्यांची विसाव्याची ठिकाणे
क्षेत्रभेटींमध्ये युरेशियन कर्ल्यू, मोठ्या संख्येने आढळलेले क्रेन, तसेच अभयारण्याच्या काठावर हरिअर पक्ष्यांची विसाव्याची ठिकाणे नोंदविण्यात आली. रंगीत करकोचा आणि राखी बगळा यांच्या प्रजनन वसाहतींची नोंदही करण्यात आली. १७ जानेवारीला काही सहभागींसाठी बिबट्याचे दर्शन हा विशेष अनुभव ठरला. पक्ष्यांच्या आवाजांचे महत्त्व स्पष्ट करत शरद आपटे यांनी सत्र घेतले आणि आपल्या क्षेत्रानुभवातून मार्गदर्शन केले.
फोटो - 153
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.