बालमोहनच्या पायऱ्यांवर पुन्हा उमलले बालपण
६८ वर्षांनंतर विद्यार्थी एकत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : दादर, शिवाजी पार्क येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेतील १९५७ च्या बॅचच्या दहावीतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. जवळपास ६८ वर्षांनी हे विद्यार्थी एकत्र आले होते. त्यावेळचे विद्यार्थी आज ८५/८६ वर्षांचे आजी-आजोबा झाले आहेत. या निमित्ताने शाळेच्या गोड आठवणींना उजाळा मिळाला. वार्धक्य विसरून चेष्टा, मस्करी, गाणी गप्पा आणि बैठे खेळ खेळताना सर्वांना चेहऱ्यावर हास्य उमलले होते.
शाळा सोडून या विद्यार्थ्यांना ६८ वर्षे झाली असली तरीही १९८२ सालापासून हे विद्यार्थी सातत्याने भेटत आहेत. कोरोनाचा काळ वगळता या विद्यार्थ्यांचे दरवर्षी स्नेहसंमेलन होते. आता नवी ऊर्जा घेऊन, जुन्या मित्र मैत्रिणींना भेटण्यासाठी २५ पैकी सहा विद्यार्थी आणि आठ विद्यार्थिनींनी या संमेलनाला हजेरी लावली होती. दूर राहणारे किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही विद्यार्थी येऊ शकले नाहीत.
सकाळी ११.३० वाजता शाळेच्या तळमजल्यावर सर्व जण एकत्र जमले. दादासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, १९५७ साली जशी म्हटली जात होती तशीच शाळेची प्रार्थना ‘अंतर मम’ पुन्हा एकदा भारलेल्या मनाने सर्वानी म्हटली. ग्रुप फोटो काढल्यानंतर सर्वजण छोट्या हॉलमध्ये गोलाकार खुर्च्यांवर बसले आणि आठवणींचा ओघ वाहू लागला.
चहा-नाश्त्यानंतर गप्पा अधिकच रंगल्या. वयपरत्वे दृष्टी बाधित माजी विद्यार्थी प्रभा सोनावणे यांनी आपल्या धाकट्या बहिणीसह आवर्जून हजेरी लावली. दुपारच्या भोजनानंतरही गप्पांचा सिलसिला थांबायचे नाव घेत नव्हता. ‘पुढच्या वर्षी नक्की भेटायचे’ अशा हृदयस्पर्शी शब्दांत एकमेकांना पुन्हा भेटण्याची शपथ घेत, हसत-खेळत पण थोड्या ओलावलेल्या डोळ्यांनी सर्व जण आपापल्या घरी परतले.
स्नेहसंमेलनाची परंपरा
बालमोहनचे दादासाहेब रेगे हे विद्यार्थ्यांचे श्रद्धास्थान. त्यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त १९५७ चे उत्तीर्ण विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. तेव्हापासून या स्नेहसंमेलनाची परंपरा सुरू झाली. काही काळ खंड पडला असला तरी गेल्या वर्षापासून पुन्हा भेटीगाठी सुरू करण्याची ओढ प्रत्येकाच्या मनात होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.