प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी
भाजपला सर्वाधिक समित्यांचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता प्रभाग समित्यांच्या (वॉर्ड कमिटी) अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत ८९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडे सर्वाधिक आठ प्रभाग समित्या येण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मनसे युतीच्या वाट्याला सहा समित्या मिळताना दिसत आहेत.
महायुतीमधील भाजप आणि शिंदे गटाच्या मदतीने १९ पैकी आठ प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व असेल. २०१७मध्ये भाजपच्या नऊ समित्या होत्या. त्यात यंदा एका समितीची घट झाली आहे. मात्र महायुतीचे संख्याबळ पाहता भाजप प्रबळ स्थितीत आहे.
भाजप महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्याने त्यांचा महापौर होणार हे निश्चित. पण अद्याप महापौर कोण होणार, हे स्पष्ट झाले नसले तरी प्रभाग समित्यांच्या या गणितामुळे सत्तेचे केंद्र कुणाकडे झुकणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
भाजपला या प्रभाग समित्यांमध्ये मिळू शकते यश
* सी, डी वार्ड : ७ नगरसेवक
* के पश्चिम वॉर्ड : ८ नगरसेवक
* आर दक्षिण वॉर्ड : १० नगरसेवक
* आर उत्तर, आर मध्यम : ११ नगरसेवक
* के दक्षिण, पी दक्षिण, एम पश्चिम आणि एन वॉर्डमध्येही भाजपचे अध्यक्ष बसण्याची शक्यता आहे.
ठाकरेंचे संख्याबळ घटले
६५ जागा जिंकणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेच्या सहा नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्याकडे सहा प्रभाग समित्या राहतील. २०१७मध्ये अविभाजित शिवसेनेकडे आठ समित्या होत्या; मात्र यंदा संख्याबळ घटल्याने दोन समित्या उद्धव गटाच्या हातून निसटल्या आहेत.
येथे असू शकतो ठाकरे-मनसेचा अध्यक्ष
एफ उत्तर वॉर्ड, जी दक्षिण/जी उत्तर वॉर्ड, एच पूर्व /एच पश्चिम वॉर्ड, के पूर्व/के उत्तर वॉर्ड
भांडुप, मुलुंडमध्ये लॉटरी लागणार?
काही प्रभागांमध्ये महायुती आणि विरोधी पक्षांचे संख्याबळ समान असल्याने पेच निर्माण झाला आहे. भांडुप आणि मुलुंड प्रभागात भाजप (नऊ) + शिंदे गट (एक) असे १० नगरसेवक आहेत, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे (आठ) + काँग्रेस (एक) + मनसे (एक) असे १० नगरसेवक आहेत. अशा स्थितीत प्रभाग समिती अध्यक्षपदाचा निकाल ‘लॉटरी’ (चिठ्ठी) टाकून काढला जाऊ शकतो.
इतर पक्षांची स्थिती
* काँग्रेस : शिवसेना ठाकरे आणि सपाच्या मदतीने काँग्रेसला ए, बी आणि ई वॉर्डमध्ये यश मिळू शकते.
* एमआयएम : पहिल्यांदाच मुंबईत एमआयएमचा प्रभाग समिती अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे. एम पूर्व वॉर्डमध्ये त्यांचे सहा नगरसेवक असल्याने ही समिती त्यांच्याकडे जाऊ शकते.
* राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार : कुर्ला वॉर्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) दोन नगरसेवक निर्णायक ठरतील. ते ज्याला पाठिंबा देतील त्याचाच अध्यक्ष तिथे निवडला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.