बीडीडीवासीयांची टप्प्याटप्प्याने गृहस्वप्नपूर्ती!
दहा दिवसांत नायगावच्या ८६४ तर वरळीच्या ५५६ जाणांना मिळणार घराचा ताबा
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : वर्षानुवर्षे १६० चौरस फुटाच्या घरात वास्तव्य करणाऱ्या बीडीडी चाळवासीयांची टप्प्याटप्प्याने गृहस्वप्नपूर्ती होत आहे. वरळी येथील बीडीडी चाळीतील ५५६ रहिवाशांना याआधीच घराचा ताबा दिलेला असताना म्हाडाकडून आता दुसऱ्या टप्प्यात अणखी ५५६ रहिवाशांना, तर नायगाव येथील सुमारे ८६४ रहिवाशांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घराचा ताबा दिला जाणार आहे. त्याबाबतची तयारी म्हाडाकडून सुरू आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे सुसज्ज घराच्या प्रतीक्षेत असलेल्या बीडीडीवासीयांना मोठा दिलासा मिळत आहे
म्हाडाकडून बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील जवळपास १५ हजार घरांचा पुनर्विकास केला जात आहे. चार वर्षांपूर्वी बीडीडी चाळ पुनर्विकासाला सुरुवात झाली असून, टप्प्याटप्प्याने इमारती उभारल्या जात आहेत. त्यानुसार रहिवाशांना घराचा ताबा देण्याचे धोरण म्हाडाने अवलंबले आहे. ऑगस्टमध्ये वरळी येथील नव्याने उभ्या राहिलेल्या डी आणि ई विंगमधील घरांचा ५५६ रहिवाशांना ताबा दिला असून, आता दुसऱ्या टप्प्यात आणखी दोन विंगमधील ५५६ जणांची ग्रह स्वप्नपूर्ती होणार आहे. तसेच नायगाव बीडीडीच्या पुनर्वसन इमारत क्र. ८ मधील टाॅवर क्र. चार ते आठ या पाच इमारतींचे काम पूर्ण झाले असून, ८६४ रहिवाशांना सुरुवातीला दिवाळीत घरांचा ताबा दिला जाणार होता. मात्र ओसीला विलंब झाल्याने ते पुढे गेले. त्यानंतर पालिका निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने ताबा दिला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घरांचा ताबा देण्याची तयारी सुरू केली असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ओसीची प्रक्रिया सुरू
म्हाडाने नायगाव येथे उभारलेल्या इमारत क्रमांक आठमधील इमारत क्रमांक चार ते आठ या पाच इमारतींचे काम पूर्ण झाले असून, त्याला याआधीच ओसी मिळाली आहे. दरम्यान, वरळी बीडीडी येथील दोन विंगचेही काम पूर्ण झाले असून, ओसी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ओसी पुढील पाच-सहा दिवसांत येणार असून, त्यानंतर घरांचा ताबा दिला जाणार आहे.
३०-४० हजार रुपये भाड्याचा प्रश्न
म्हाडाकडून सध्या बीडीडी चाळकऱ्यांना पुनर्विकासादरम्यान मासिक २५ हजार रुपये भाडे दिले जात आहे. ते ३०-४० हजार रुपये करावे, अशी रहिवाशांची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने मासिक ३० हजार रुपये भाडे देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. दरम्यान, रहिवाशांची मागणी ३५ ते ४० हजार रुपये असल्याने अंतिम भाडे किती द्यायचे याबाबतचा निर्णय सरकार दरबारी होईल, असेही म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले. या भाडेवाढीने वर्षाला कोट्यवधी रुपयांचा भार म्हाडावर पडणार आहे.
उभारली जाणारी एकूण घरे
- वरळी : ९,६८९
- नायगाव : ३,३४४
- ना. म. जोशी मार्ग : २,५६०
- ताबा दिला : ५५६
- फेब्रुवारीत ताबा देणार : १,४२०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.