मुंबईचा ‘प्रथम नागरिक’ कोण?
महापौरपदासाठी भाजपकडून पाच महिला नेत्यांची नावे आघाडीवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : महापालिका निवडणुकीत ८९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर आता मुंबईच्या ‘प्रथम नागरिक’ पदावर आपला झेंडा फडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी महापौर निवडणुकीसाठी भाजपकडून पाच महिला उमेदवारांची नावे सध्या आघाडीवर असून, पक्षातील अंतर्गत गोटात या नावांवर जोरदार चर्चा सुरू आहे.
नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीत मुंबईचे महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. या सोडतीमुळे महापालिकेवर ‘महिलाराज’ येणार हे स्पष्ट झाले असून, भाजपच्या अनेक मातब्बर नगरसेविकांसाठी संधीची दारे उघडली आहेत. महायुतीकडे ११८चे संख्याबळ असल्याने (बहुमताचा आकडा ११४) भाजपचा महापौर विराजमान होण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर निवडणूक होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या गोटात महापौरपदासाठी जी नावे चर्चेत आहेत त्यात सर्वात वरती रितू तावडे यांचे नाव आहे. घाटकोपरमधून दुसऱ्यांदा विजयी झालेल्या तावडे या एक अनुभवी चेहरा आहेत. भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम आणि गुजरातीबहुल भागातील त्यांची पकड यामुळे त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या अलका केरकर यांचे नावदेखील घेतले जात आहे. वांद्रे (पश्चिम)मधून चौथ्यांदा निवडून आलेल्या ७३ वर्षीय केरकर या पक्षातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. यापूर्वी उपमहापौर म्हणून त्यांनी काम केले असल्याने अनुभवाच्या जोरावर त्यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. निवडणुकीपूर्वी पक्षात आल्या असल्या तरी तेजस्वी घोसाळकर यांचे नावदेखील घेतले जात आहे. दहिसरमधून १० हजारांहून अधिक मतांनी विजयी झालेल्या तेजस्वी घोसाळकर या युवा आणि आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात.
शिवसेनेतून (ठाकरे) भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी मिळवलेला विजय आणि त्यांचा अभ्यासूपणा यामुळे पक्ष त्यांना मोठी संधी देऊ शकतो. सायन कोळीवाडा भागातील राजश्री शिरवाडकर यांचे नावदेखील महापौरपदासाठी चर्चेत असून त्या अनुभवी आणि खंबीर कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. पक्षाच्या संघटनात्मक कार्यात त्यांचा मोठा हातखंडा असून, पक्षनिष्ठेचा विचार करता त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू आहे.
याचबरोबर माहीम प्रभागातून निवडून आलेल्या शीतल गंभीर यांच्याकडेदेखील महापौरपदाचा उमेदवार म्हणून पाहिले जात असून त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव ही जमेची बाजू आहे. उच्चशिक्षित आणि अनुभवी चेहरा अशी त्यांची ओळख असल्याने त्याही महापौरपदाच्या शर्यतीत शड्डू ठोकून आहेत.
भाजपची मोर्चेबांधणी
या पाच नावांव्यतिरिक्त हर्षिता नार्वेकर आणि योगिता कोळी यांच्या नावांचीही दबक्या आवाजात चर्चा आहे; मात्र अंतिम शिक्का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे वरिष्ठ नेते मारतील. भाजपने आपल्या नगरसेवकांची बांधणी सुरू केली असून, ३० वर्षांनंतर मुंबई पालिकेवर भाजपचा महापौर बसवण्यासाठी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.