रिक्षा-टॅक्सी डिजिटायझेशन
देशासाठी मॉडेल ठरेल!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : रिक्षा-टॅक्सी प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ईटीएस ३६० कंपनीमार्फत बिगसी ( ब्लॅक येलो ग्रीन सेफ्टी) योजना सुरू करण्यात आली आहे. सरकार, चालक किंवा प्रवाशांवर कोणताही खर्चाचा भार न देता रिक्षा-टॅक्सी डिजिटायझेशन करण्यात आले आहे. यामुळे रिक्षा-टॅक्सी लोकेशन कळणार असून गैरकृत्यांना आळा बसेल. हा उपक्रम देशासाठी मॉडेल ठरू शकतो, असे मत परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी व्यक्त केले.
बिगसी योजनेचे उद्घाटन भीमनवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सह परिवहन आयुक्त शैलेश कामत, उपायुक्त (वाहतूक ) अजित बोराडे, अंधेरीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, बिगसी पब्लिक सेफ्टी उपक्रमाचे संस्थापक प्रा. निरंजन भट उपस्थित होते. भीमनवार म्हणाले, की आपत्कालीन परिस्थिती कधीही येते. हे आपल्याला माहिती नसते. त्यामुळे महिला सुरक्षेसाठी उपक्रम महत्त्वाचे आहे. बिगसीचा महिला आणि बालसुरक्षेसाठी एक चांगला उपक्रम सुरू होत आहे. आता रिक्षा-टॅक्सीमध्ये ही सुविधा मिळणार असल्यामुळे प्रवाशांना माेठा दिलासा मिळणार आहे.
====
अशी मिळेल पाच मिनिटांत मदत
प्रवाशांच्या सीटसमोर आणि चालकाच्या मागे ड्रायव्हर/वाहनाचा ओळखपत्र पॅनेल (आयडी पॅनेल) लावण्यात आला आहे. त्यावरील क्यूआर कोड बिगसी ॲप वापरून स्कॅन केला जाणार आहे. त्यावर गुगल मॅप दिसेल. यामध्ये एसओएस बटण असून ते सक्रिय केल्यास वाहन-चालक, प्रवाशांचे तपशील ११२ या पाेलिस नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर पाठवले जातात. त्यानंतर जवळची गस्त घालणारी पोलिस व्हॅन वाहनाचा माग काढते आणि पाच मिनिटांत मदत पुरवते.
==
सर्वच क्षेत्रांत महिला अग्रेसर आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी क्यूआर कोड योजना चांगली आहे. त्याची अंमलबजावणी चांगल्या रीतीने व्हायला हवी. ग्रामीण भागातही सुविधा पाेहाेचली पाहिजे.
- वर्षा विद्या विलास, सामाजिक कार्यकर्त्या
==
बिगसी योजना परिवहन विभाग आणि महाराष्ट्र पोलिस विभागाच्या सहकार्याने ईटीएस ३६० कंपन्यांशी झालेल्या सामंजस्य करारानुसार सुरू करण्यात आली आहे. अशी तांत्रिक प्रणाली भारतात सुरू करणारे मुंबई हे पहिले शहर आहे. या याेजनेचा खर्च सीएसआर निधीतून केला आहे.
- प्रा. निरंजन भट, संस्थापक, बिगसी योजना
==
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.