सागरी सूक्ष्म शैवाल जैवसंशोधनाला बळ
मुंबई विद्यापीठाला केंद्राचा ७१.७४ लाख रुपयांचा निधी
मुंबई, ता. २५ : मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्रात (सीईएमएएस) कार्यरत असलेल्या सागरी जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या संशोधनाला केंद्र सरकारकडूनच निधी उपलब्ध झाल्याने या संशोधनाला मोठे बळ मिळाले आहे.
मुंबई विद्यापीठातील सीईएमएएसला भारत सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी ‘डीप ओशन मिशन’ (डीओएम) कार्यक्रमांतर्गत सागरी सूक्ष्म शैवालच्या जैवसंशोधनावर आधारित एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल ७१.७४ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
केंद्र शासनाकडून मुंबई विद्यापीठाला सागरी जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनासाठी मिळालेले हे महत्त्वपूर्ण अनुदान असल्याचे या केंद्राच्या उपसंचालिका प्रा. वर्षा केळकर-माने यांनी सांगितले.
सागरी सूक्ष्म शैवालच्या जैवसंशोधनाच्या माध्यमातून विशेषतः वेगाने विकास होत असलेल्या सौंदर्यप्रसाधन उद्योगात या सूक्ष्म शैवालांचा उपयोग करण्याच्या शक्यतांचा शोध घेणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या समृद्ध सागरी परिसंस्थेतील सूक्ष्म शैवालांच्या प्रचंड क्षमतेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने उचललेले एक ठोस पाऊल आहे. असल्याचे प्रा. वर्षा केळकर माने यांनी सांगितले. त्या या प्रकल्पाच्या प्रमुख अन्वेषक म्हणून संपूर्ण प्रकल्पाचे नेतृत्व आणि कार्यान्वयन करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
सागरी सूक्ष्म शैवाल हे जैवविविधतेचे एक मौल्यवान भांडार आहे आणि त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे घटक दडलेले आहेत. भूविज्ञान मंत्रालयाच्या या अनुदानाने पश्चिम किनारपट्टीवरील या नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर करून, सौंदर्यप्रसाधन उद्योगात नवीन संधी निर्माण होऊ शकेल. तसेच हा प्रकल्प केवळ वैज्ञानिकदृष्ट्याच महत्त्वाचा ठरणार नाही, तर तो स्थानिक समुदायांच्या आर्थिक विकासासाठीदेखील महत्त्वाचा ठरेल.
जागतिक स्तरावर सौंदर्यप्रसाधनांसाठी सूक्ष्म शैवालपासून मिळालेल्या जैवसक्रिय घटक (बीओऍक्टिव्ज) बाजारपेठेत तीव्र गतीने होणारी वाढ ही त्यामधील शाश्वत, नैसर्गिक आणि अनोख्या आयुप्रतिरोधी घटकांच्या चढ्या मागणीमुळे होत आहे. २०२४-२०२५ मध्ये व्यापक सूक्ष्म शैवाल बाजारपेठेचे मूल्य सुमारे १.२-१.७ अब्ज युएसडी होते व ते २०३० पर्यंत ३०० दशलक्ष युएसडीपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तविला आहे. प्रसाधनांसाठी वापरून झालेल्या शैवालचे उत्तम खतसुद्धा बनवता येत असून, ते एक शाश्वत विकासाचे उदाहरण या अभ्यासाद्वारे मांडण्यात येणार आहे.
या प्रकल्पात व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या जैवक्रियाशीलच्या उत्पादनासाठी सूक्ष्म-शैवालांचे संकलन केंद्र स्थापन करण्याचे ही योजले आहे. भारतातील सागरी जलसाठ्यांमधून सूक्ष्म शैवालचे नमुने गोळा करून त्यांचे वर्गीकरण करून ठेवले जाणार आहे. त्यांच्या विविध प्रजाती ओळखण्यासाठी अतिशय प्रगत अशा पुढील पिढीचे अनुक्रमण (नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग) चा वापर केला जाईल, तर अनेक विश्लेषणात्मक तंत्रांचा वापर करून व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या सक्रिय घटक चे प्रोफाइलिंग करण्याचे या प्रकल्पामध्ये योजले आहे.
सागरी अभ्यास केंद्राला मिळालेले हे मोठे यश संस्थेच्या संशोधनात्मक कार्याची आणि सागरी जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाची पावती आहे. या प्रकल्पामुळे निश्चितच सागरी सूक्ष्म शैवाल आधारित उत्पादनांच्या विकासामध्ये आणि संबंधित उद्योगांच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळेल.
- प्रा. रवींद्र कुलकर्णी,
कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.