जेजे-भायखळा सिग्नलमुक्त
८४८ कोटींच्या केबल-स्टेड पुलाचे काम वेगात; दक्षिण मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. जेजे उड्डाणपूल आणि भायखळ्याचा वाय ब्रिज यांना जोडणाऱ्या ८९२ मीटर लांब भव्य केबल-स्टेड पुलाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. वांद्रे-वरळी सी-लिंकच्या धर्तीवर उभारला जाणारा हा आधुनिक पूल दक्षिण मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणार आहे.
प्रवासाचा वेळ १५ मिनिटांनी वाचणार
सध्या जेजे उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर भायखळा, दादर किंवा माटुंग्याकडे जाताना वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या नवीन चारपदरी पुलामुळे हा प्रवास पूर्णपणे सिग्नल फ्री होईल. परिणामी प्रवाशांचा किमान १५ ते २० मिनिटांचा मौल्यवान वेळ वाचणार असून, मोहम्मद अली रोडवरील ताणही कमी होईल.
तांत्रिक अडथळे आणि सावध पावले
अनेक नागरिकांना कामाचा वेग संथ वाटत असला तरी त्यामागे तांत्रिक आव्हाने मोठी आहेत. महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे, की भूमिगत गुंतागुंत हे यामागील मोठे कारण आहे. जमिनीखाली १०० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पाणी आणि गॅसवाहिन्या आहेत. त्यांना धक्का न लावता पायलिंग (पायाभरणी) करणे जिकिरीचे आहे. हा भाग अत्यंत दाट वस्तीचा असल्याने अवजड यंत्रसामग्रीचा वापर केवळ रात्रीच्या वेळीच केला जात आहे.
रेल्वे हद्दीतील जिकिरीचे काम
मध्य रेल्वेच्या हद्दीत आणि मुख्य रस्त्यांवर काम करताना पोलिसांच्या मर्यादित वेळेतच सर्व हालचाली कराव्या लागत आहेत. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञान प्रकल्प २०२९पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून महापालिकेने आता प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. यात पुलाचे मोठे भाग दुसऱ्या ठिकाणी तयार करून रात्रीच्या वेळी आणून बसवले जातील. कामाचा दर्जा राखण्यासाठी स्वतंत्र थर्ड पार्टी ऑडिटचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर प्राधिकरणांची मदत
रेल्वे हद्दीतील काम, इतर पुलांना जोडणारे काम असे तांत्रिकदृष्ट्या जिकिरीचे काम असून, हे काम करण्यासाठी एमएमआरडीए प्रशासनाची मदत घेण्यात येत आहे. त्यांनी यातील ५० टक्के काम पूर्ण केले आहे. यामध्ये मुख्यत्वे केबल-स्टेड कामाचा वापर केला जात आहे. यापुढील भायखळा फायर ब्रिगेड ते डीजे उड्डाणपुलादरम्यानचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे. या कामालादेखील लवकरच सुरुवात होईल, असे पूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हा केवळ रस्ता नाही तर दक्षिण मुंबईची नवी ओळख असेल. सध्या काम संथ वाटत असले तरी ते नियोजित आराखड्याप्रमाणे सुरू आहे. २०२६च्या मध्यापर्यंत पुलाचे खांब पूर्णपणे उभे राहिले तर निर्धारित वेळेत हा पूल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, असेही या अधिकाऱ्याने पुढे सांगितले.
प्रकल्पावर एक नजर
एकूण लांबी - ८९२ मीटर
प्रकल्प खर्च - ८४८.६३ कोटी
पद्धत - केबल-स्टेड (कमी खांब, आधुनिक रचना)
मुदत - ३६ महिने (२०२९ पर्यंत पूर्ण)
पुलामुळे होणारे प्रमुख फायदे
* वाहतूक कोंडीतून सुटका : दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या मोहम्मद अली रोड आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.
* प्रवासाच्या वेळेत बचत : जेजे उड्डाणपुलावरून थेट भायखळ्याला जाता येणार असल्याने प्रवाशांचा किमान १५ ते २० मिनिटांचा मोलाचा वेळ वाचेल.
* सिग्नल फ्री प्रवास : हा नवीन चारपदरी पूल प्रवाशांना विनाअडथळा आणि सिग्नल फ्री प्रवासाचा आनंद देईल.
* इंधनाची बचत : प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळे आणि सिग्नलवरील प्रतीक्षा संपल्यामुळे वाहनांच्या इंधनाची मोठी बचत होईल.
* मुंबईची नवी ओळख : वांद्रे-वरळी सी-लिंकच्या धर्तीवर बांधला जाणारा हा आधुनिक केबल-स्टेड पूल दक्षिण मुंबईच्या सौंदर्यात भर घालेल आणि एक नवीन पर्यटन आकर्षण ठरेल.
* आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञानामुळे पुलाचे काम दर्जा राखून आणि परिसरातील वस्तीला कमीत कमी त्रास देऊन पूर्ण करण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.