विल्सन जिमखाना वाचवण्यासाठी गिरगावकर आझाद मैदानात
घोषणांनी परिसर दुमदुमला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मरीन ड्राइव्ह येथील ऐतिहासिक विल्सन जिमखान्यावर ‘जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन’ने लावलेल्या फलकांच्या निषेधार्थ आणि खेळाचे मैदान वाचवण्यासाठी आज ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात भव्य मोर्चा काढण्यात आला. ‘मैदान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत गिरगावकरांनी आणि विल्सन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपला रोष व्यक्त केला.
विल्सन जिमखान्याचा वाद सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असे असतानाही, निकालापूर्वीच या जिमखान्यावर जैन इंटरनॅशनल संस्थेचे फलक झळकल्याने स्थानिक रहिवासी आणि खेळाडूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘स्थानिक मुलांच्या खेळाची मैदाने परप्रांतीयांना बळकावू देणार नाही,’ असा आक्रमक पवित्रा या वेळी मोर्चेकऱ्यांनी घेतला. न्यायालयाचा निकाल लागण्यापूर्वीच हा जिमखाना कोणत्या अधिकारात संबंधित संस्थेला देण्यात आला, असा प्रश्न आम्ही गिरगावकरच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला. आगामी निवडणुकांसाठी लागणाऱ्या निधीसाठी सरकारने ही भूमिका घेतली आहे का, असा आरोप मिलिंद वेदपाठक यांनी केला. चौकांची नावे बदलली, चाळी गिळल्या, पुरातन मंदिरे आणि मासळी बाजारही गिळंकृत केले; आता मैदानांवर डोळा आहे, असा संताप शिल्पा नायक यांनी व्यक्त केला.
...
विद्यार्थी मोर्चात सामील
विल्सन महाविद्यालयातील विद्यमान आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने या मोर्चात सामील झाले होते. वर्षानुवर्षे गिरगावातील मुले आणि महाविद्यालयाचे खेळाडू ज्या मैदानावर सराव करतात, ते मैदान खासगी संस्थेच्या ताब्यात गेल्याने खेळाडूंच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. जोपर्यंत विल्सन जिमखाना पुन्हा सर्वसामान्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खुला होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धार गौरव सागवेकर यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे आता राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.