राज्याच्या विकासाचे विद्यापीठात धडे
त्रैमासिक जीएसडीपी नाऊकास्टिंगचा होणार अभ्यास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : आर्थिक प्रशासनातील अग्रणी भूमिका पुन्हा अधोरेखित करत महाराष्ट्राने देशात प्रथमच राज्याच्या त्रैमासिक स्थूल देशांतर्गत उत्पन्न (जीएसडीपी) निर्धारणासाठी नाऊकास्टिंग पद्धतीचा अवलंब करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभाग आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (एमआयटीआरए) यांच्या सहकार्याने हा अभ्यास मुंबई विद्यापीठाच्या मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था (एमएसईपीपी) (आधीचे अर्थशास्त्र विभाग) यांना प्रदान करण्यात आला आहे. ‘मित्रा’ची प्रमुख ज्ञान संस्था म्हणून एमएसईपीपी या प्रकल्पाची ज्ञान भागीदार म्हणून जबाबदारी पार पाडत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश राज्याच्या जीएसडीपीचे वेळेवर, अचूक आणि विश्वासार्ह अंदाज उपलब्ध करून देण्यासाठी एक सशक्त चौकट विकसित करणे हा आहे. सध्या जीएसडीपीची अधिकृत आकडेवारी वार्षिक स्वरूपात आणि लक्षणीय विलंबाने उपलब्ध होत असल्याने तातडीच्या धोरणात्मक निर्णयांसाठी ती अपुरी ठरते. नाऊकास्टिंगद्वारे त्रैमासिक रिअल-टाइम अंदाज उपलब्ध झाल्यास राज्याच्या आर्थिक हालचालींचे तत्काळ निरीक्षण शक्य होणार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आकाराने मोठी, क्षेत्रीय व प्रादेशिकदृष्ट्या अत्यंत वैविध्यपूर्ण असल्याने या उपक्रमाचे महत्त्व विशेष आहे.
प्रकल्पाचे समन्वयन एमएसईपीपीचे नोडल अधिकारी अर्थतज्ज्ञ प्रा. सत्यनारायण कोठे करतील. त्यांच्यासोबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ बिपुल घोष आणि सुप्रिया निकम (फेलो बी, एमएसईपीपी) सहभागी असतील. वीज वापर, जीएसटी संकलन, डिजिटल व्यवहार, मालवाहतूक, वाहन नोंदणी आणि कृषी बाजारातील उच्च-वारंवारतेच्या निर्देशकांच्या आधारे प्रगत अर्थमितीय तंत्रे, डायनॅमिक फॅक्टर मॉडेल्स आणि मशीन लर्निंग पद्धती वापरून त्रैमासिक जीएसडीपीचे अंदाज तयार केले जाणार आहेत.
एमएसईपीपीच्या संचालिका प्रा. मनीषा करणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा हा प्रकल्प राज्यस्तरीय आर्थिक निरीक्षणासाठी शाश्वत, विस्तारक्षम आणि पुनरुत्पादनीय प्रणाली विकसित करेल. या उपक्रमाचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी अभिनंदन केले असून, विकसित महाराष्ट्र २०४७ आणि विकसित भारत २०४७ या ध्येयांच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
२७.७२ लाखांचा निधी मंजूर
दोन वर्षांच्या प्रकल्पासाठी शासनाकडून मुंबई विद्यापीठास रुपये २७.७२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्रैमासिक जीएसडीपी अंदाजांमुळे आर्थिक मंदी अथवा तेजीची लवकर ओळख, महागाई, पुरवठा साखळीतील अडथळे किंवा बाह्य आर्थिक धक्क्यांवर वेळीच आणि प्रभावी धोरणात्मक प्रतिसाद देणे सुलभ होणार आहे.
फोटो - 855
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.