‘बीआयटी’ भाडेकरूंच्या लढ्याला यश
एक रुपया प्रति चौरस फूट भाडेदराला मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईतील विविध वसाहतींमधील भाडेकरूंच्या प्रदीर्घ आणि तीव्र संघर्षाला अखेर मोठे यश मिळाले आहे. भाडेवाढ आणि हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर, शासनाने आता एक रुपया प्रति चौरस फूट या सवलतीच्या भाडेदराला मंजुरी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक सोमवारी (ता. २) जारी करण्यात आले. या निर्णयामुळे हजारो भाडेकरूंना मोठा दिलासा मिळाला असून, भाडेकरूंच्या एकजुटीची ही मोठी ताकद मानली जात आहे.
सरकारकडून केवळ भाडेदरातच नाही, तर हस्तांतरण प्रक्रियेत अडकलेल्या प्रस्तावांच्या बाबतीतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये २०१७ पासून प्रलंबित असलेल्या हस्तांतरण प्रकरणांना आता गती मिळणार आहे. २०२३ पूर्वीच्या सर्व प्रकरणांना जुन्याच कार्यपद्धतीचा अवलंब करून पूर्ण करण्यास शासनाने संमती दर्शवली आहे. यामुळे रखडलेले शेकडो प्रस्ताव निकाली निघणार असून, भाडेकरूंच्या मालमत्ता हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या धोरणाबाबत गेल्या चार वर्षांपासून आयुक्त आणि शासन स्तरावर अनेक बैठका पार पडल्या. या लढ्यात तब्बल १३३ संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला होता. भाडेकरू आणि या संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळेच शासनाला या मागण्या मान्य करण्यास भाग पडले आहे. या यशानंतर भाडेकरू संघटनांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी सर्व सहभागी संघटना आणि भाडेकरू बांधवांचे अभिनंदन केले आहे. तसेच, या लढ्यात वेळोवेळी पाठबळ देणाऱ्या आणि विधानमंडळात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींचेही विशेष आभार मानण्यात आले आहेत.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.