जीएमएलआर उड्डाणपूल ३१ मेपर्यंत खुला करा
अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश; प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या (जीएमएलआर) कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मुलुंड (पश्चिम) येथील वाहतूक कोंडीची समस्या विचारात घेऊन उत्तर दिशेकडील तानसा जलवाहिनीवरील छोटा उड्डाणपूल आगामी ३१ मे २०२६पर्यंत पूर्ण करून वाहतुकीस खुला करावा, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिले आहेत.
बांगर यांनी बुधवारी (ता. ४) मुलुंड येथील खिंडीपाडा, सोनापूर जंक्शन आणि गोरेगाव येथील चित्रनगरी परिसरातील कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या वेळी प्रकल्पातील आव्हाने आणि प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. मुलुंड पश्चिमेतील गुरू गोविंद सिंग मार्ग ते नाहूर रेल्वे पुलापर्यंत १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारला जात आहे. या पुलासाठी प्रस्तावित असलेल्या ४८ खांबांपैकी ३९ खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. ४७पैकी १० स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. डॉ. हेडगेवार चौक येथे १२० मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल मेट्रो-४च्या पहिल्या स्तरावर बांधला जाणार आहे.
सध्या मुख्य उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक वळवण्यात आली असून, नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे तानसा जलवाहिनीवरील छोटा पूल मेअखेरपर्यंत सुरू झाल्यास मोठा दिलासा मिळेल, असे बांगर यांनी या वेळी नमूद केले. संपूर्ण प्रकल्प १५ जून २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पाहणी दौऱ्यात महापालिकेचे अभियंते आणि सल्लागार उपस्थित होते.
---------
‘लॉन्चिंग शाफ्ट’चे काम पूर्ण
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या कामासाठी गोरेगाव येथे ‘लॉन्चिंग शाफ्ट’ खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात टनेल बोअरिंग मशीन शाफ्टमध्ये उतरवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी ३५० टनाची क्रेन दाखल झाली असून, २२ फेब्रुवारीपर्यंत ८०० मेट्रिक टनाची दुसरी क्रेनही कामाच्या ठिकाणी पोहोचणार आहे.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.