मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा
जप्तीसह लिलावाच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मालमत्ता कराचा भरणा करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिका अधिनियमातील कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहे. विहित मुदतीत कर न भरल्यास मालमत्तेतील वस्तूंची जप्ती आणि पुढील टप्प्यात थेट लिलाव करण्याची कारवाई केली जाणार आहे.
महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवली जात आहे. पालिकेने स्पष्ट केले, की प्रामाणिक करदात्यांवर अन्याय होऊ नये आणि शहराच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेला महसूल वेळेत जमा व्हावा, हा या कारवाईमागचा मुख्य उद्देश आहे.
कर निर्धारण व संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ५,४२६ कोटी ८१ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. आर्थिक वर्षाचे उर्वरित दोन महिने लक्षात घेता, वसुलीला गती देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
मुंबई महापालिका अधिनियमातील कलम २०३ ते २०६ मधील तरतुदींनुसार, थकबाकी न भरल्यास प्रथम मालमत्तेतील चीजवस्तू जप्त केल्या जातील. त्यानंतरही वसुली न झाल्यास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मालमत्तेचा जाहीर लिलाव केला जाईल.
दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सर्व मालमत्ताधारकांनी आपला थकबाकीसह चालू मालमत्ता कर तातडीने भरावा, असे आवाहन सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांनी केले आहे.
हे आहेत मोठे थकबाकीदार
१. मेसर्स कमला मिल्स, जी दक्षिण - १२ कोटी १ लाख
२. मेसर्स सुमेर कॉर्पोरेशन, एल विभाग - ११ कोटी ९८ लाख
३. मेसर्स ट्रान्सकॉन शेठ क्रिएटर्स, पी उत्तर - ११ कोटी ९८ लाख
४. मेसर्स फोरमोस्ट रिअल्टर्स प्रा., एच पूर्व - ११ कोटी ९१ लाख
५. मेसर्स श्री साई ग्रुप, के पश्चिम - ११ कोटी ३१ लाख
६. मेसर्स अकॉर्ड बिल्डर्स, एल विभाग - ११ कोटी २० लाख
७. मेसर्स सुमेर कॉर्पोरेशन (चांदिवली), एल विभाग - १० कोटी ६३ लाख
८. मेसर्स आमीर पार्क्स अँड ॲम्युझमेंट, पी दक्षिण - ९ कोटी ५६ लाख
९. मेसर्स इम्तियाज अब्दुल गफार, के पश्चिम - २ कोटी ५४ लाख
१०. अमीनुल्लाह जहिदुल्लाह, एच पश्चिम - २ कोटी ५१ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.