शहरविकासासाठी ८१३ कोटींचा आराखडा
दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा उपमुख्यमंत्र्यांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबई शहर जिल्ह्याच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ८१३ कोटी ३५ लाख ७२ हजार रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. ‘विकासकामे विहित कालमर्यादेत आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत. ज्या यंत्रणा निधी खर्च करण्यात किंवा कामे पूर्ण करण्यात दिरंगाई करतील, अशा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,’ असा थेट इशारा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज (ता. १२) वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील सेंट्रम हॉलमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, विविध पक्षांचे आमदार, महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि जिल्हाधिकारी आंचल गोयल उपस्थित होत्या.
मंजूर आराखड्यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी ७८५ काेटी ३५ लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २८ कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील कामांसाठी ७२ हजार रुपयांचा समावेश आहे. यंदाच्या आराखड्यात आरोग्य सुविधांच्या अद्ययावतीकरणासाठी २४२ काेटी ४२ लाख, तर मत्स्यव्यवसाय आणि बंदरांच्या विकासासाठी ३० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.
शहरातील बाजारपेठांत महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी फिरते शौचालय (मोबाईल टॉयलेट) उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. पदपथ अतिक्रमणमुक्त करणे, उद्यानांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि भटक्या कुत्र्यांसाठी ‘डॉग शेल्टर’साठी जागा निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेला दिल्या.
मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाची स्थापना १९२७ मध्ये झाली असून, २०२६-२७ हे या कार्यालयाचे शताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने वर्षभर विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली. बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बैठकीतील अन्य महत्त्वाचे निर्णय
- महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नसलेले आजार समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
- बांगलादेशी घुसखोरांच्या कागदपत्रांची कसून तपासणी करून संशयास्पद कागदपत्रे रद्द करण्याचे आदेश
- दादर येथील शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभीकरण
- कोस्टल रोड आणि रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची उद्याने विकसित करून प्रदूषण कमी करण्यावर भर
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.