बनावट वेबसाइट, मोबाईल ॲप, खोट्या ई-चलन लिंकपासून सतर्क राहा
परिवहन विभागाचे वाहनचालकांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : वाहनचालक परवाना, वाहन नोंदणी आणि ई-चलन सेवांशी संबंधित फसवी संकेतस्थळे, ॲप तसेच एसएमएसवरील अनधिकृत लिंक्समुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहिती चोरी आणि ओळखीचा गैरवापर होत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी बनावट वेबसाइट्स, मोबाईल ॲप्स आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सतर्क राहावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
परिवहन विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार, नागरिकांनी फक्त अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करावा. यात वाहन नोंदणी सेवा (VAHAN) - https://vahan.parivahan.gov.in, ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) - https://sarathi.parivahan.gov.in, परिवहन सेवा - https://www.parivahan.gov.in आणि ई-चलन पोर्टल - https://echallan.parivahan.gov.in यांचा समावेश आहे. ही सर्व संकेतस्थळे ‘gov.in’ने समाप्त होतात. ‘.com’, ‘online’, ‘site’ किंवा ‘.in’ डोमेन असलेल्या कोणत्याही वेबसाइटवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. फसवणूक करणारे गुन्हेगार सहसा आपल्या वाहनाचे चलन बाकी आहे, त्वरित दंड भरा असे संदेश पाठवतात. परिवहन विभागाकडून कधीही व्हॉट्सॲप किंवा इतर ॲपद्वारे पेमेंट लिंक पाठविली जात नाही. अनधिकृत एपीके फाइल्स डाउनलोड करू नयेत. कारण त्यामुळे ओटीपी, बँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील डेटा चोरीला जाण्याचा धोका असतो.
संशयास्पद संदेश किंवा लिंक मिळाल्यास www.cybercrime.gov.in, सायबर फसवणूक हेल्पलाइन १९३० किंवा जवळचे जिल्हा सायबर पोलिस ठाणे येथे तक्रार नोंदवावी. सर्व वाहनचालक, मालक आणि नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहून प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा.
- शैलेश कामत,
सह परिवहन आयुक्त, संगणक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.